शुक्रवार, १४ जुलै, २०२३

विद्यार्थ्यांनी जात पडताळणी वेळीच करून घ्यावी - गणेश सव्वाखंडे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जात पडताळणीचे महत्व लक्षात घेऊन वेळीच आपल्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करून घ्यावी व त्याचा शैक्षणिक फायदा करून घ्यावा. यासाठी 11 वी आणि 12 वी मध्ये असताना जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व निमित्त सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालयांमध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र समिती सांगली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जाती प्रमाणपत्र मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी नलिनी आवडे तसेच जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरामध्ये श्री. सव्वाखंडे यांनी जात पडताळणी वैधता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या विषयावरती विविध उदाहरणासहित सखोल मार्गदर्शन केले. तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती व जात पडताळणीसाठी आवश्यक असणारे पुरावे यासंदर्भात विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. समतादूत शहाजी पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे फायदे व शैक्षणिक आवश्यकता या विषयावरती मार्गदर्शन केले व बार्टीच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. ए. गायकवाड, एस जी साठे, बी ए तडाखे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सदा पाटील यांनी केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा