बुधवार, १९ जुलै, २०२३

जिल्हा विकास आराखडा 28 जुलैपर्यंत तयार करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले निर्देश

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसमावेशक जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता तसेच जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांकडून विविध क्षेत्रांतील बलस्थाने, उणिवा, उत्कर्षाच्या संधी तसेच संभाव्य अडचणींचा अभ्यास करून 28 जुलैपर्यंत जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. “विकसित भारत - भारत @2047 (India@२०४७)” साठी तयार करण्यात येत असलेल्या जिल्हा विकास आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत “विकसित भारत -भारत @2047 (India@२०४७)” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे शक्य होईल. या अनुषंगाने सर्व विभागांनी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, तसेच हा आराखडा सर्वसमावेशक होण्यासाठी सामाजिक संस्थांसह विविध क्षेत्रातील लोकांनी https://forms.gle/x8sMvgSjAF4UWu1U9 या लिंकवर आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा