बुधवार, १९ जुलै, २०२३

बीएलओमार्फत मतदार यादीतील नावाची पडताळणी 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधित कुटुंब प्रमुखांकडून गोळा करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात येत आहे. मतदार यादी अचूक व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी बी. आर. माळी यांनी केले आहे. राज्यात स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनस्तरावर सज्जता ठेवण्यासाठी कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या वर्षासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार हा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण व मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावरील दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 असा आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत. दावे व हरकतींबाबत मतदार नोंदणीचे ऑफलाईन अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा बीएलओमार्फत सादर करण्यात यावेत किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline Mobile App वर देखील सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओंची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याचे श्री. माळी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा