शुक्रवार, ३० जून, २०२३

आपत्ती व्यवस्थापनामध्ये गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

कामात कुचराई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित होणार सांगली दि. 30 (जि.मा.का.) :- आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कोणतीही दिरंगाई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये यंत्रणांनी गांभिर्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून तयारी बैठक संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, कडेगाव उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जत प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवन बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, धोकादायक शासकीय इमारती, शाळा, तात्पुरती निवारा व्यवस्था यांचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करून घ्यावे. जिल्हा परिषदेकडून २३ बोटींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह पाठवावा. रेस्क्यूची आवश्यकता भासल्यास स्थानिक लोकांची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, पोहणारे, स्थानिक मंडळे, संस्था यांची बैठक घ्यावी. चारा उपलब्धतेसाठी मागणी व पुर्ततेचे नियोजन कळवावे. जलजीवन मिशनची खुदाईची कामे मान्सून मध्ये बंद ठेवावीत. कामासाठी खुदाई केलेले रस्ते सुस्थितीत करावेत. एमएसईबीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पुरेशा व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. शासकीय यंत्रणांनी अभिलेखे भिजून नुकसान होवू नये यासाठी सुव्यवस्थित ठेवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील म्हणाले, संभाव्य महापूरासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्वांनी समन्वयाने संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहू. कृषी विभागाने 2019 ची पाणीपातळी ग्राह्य धरून पंचनाम्यांसाठी पथके तयार करावीत. त्यांना आवश्यक ट्रेनिंग द्यावे. चारा तजवीज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेट लावण्यासाठी तयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच एनडीआरएफची टीम 15 जुलै पासून जिल्ह्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत 7 जुलै रोजी कर्नाटकेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यात आंतरराज्य बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा