गुरुवार, २२ जून, २०२३

अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षितेबाबतचे प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे - सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींची व अन्न पदार्थांच्या सुरक्षितेकरीता अवलंबावयाच्या नियमावलीची माहिती होण्यासाठी अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षितेबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी फुड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन (FOSTAC) प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी खासगी प्रशिक्षण संस्था यांना अधिसूचित केले आहे. अधिसूचित प्रशिक्षण संस्थाची यादी अन्न व सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या http://fostacold.fssai.gov.in/fostac/listoftrainingpartner या संकेतस्थळावार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अन्न व्यवसायिकांनी प्रशिक्षण संस्थांची निवड करून लवकरात लवकर प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सांगलीचे सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी नि. सु. मसारे यांनी केले आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रमांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे. बेसिक प्रशिक्षण - यामध्ये नोंदणीकृत फिरते विक्रेते, छोटे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षण कालावधी 4 तास आहे. प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 50 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. अडव्हान्स्ड प्रशिक्षण - यामध्ये परवानाधारक उत्पादक, केटरिंग/हॉटेल, रेस्टॉरंड, होलसेल व किरकोळ विक्रेते/वितरक, गोडवून व वाहतूकदार यांच्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षणाचा कालावधी 8 तास आहे. प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 30 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. स्पेशल प्रशिक्षण - दुध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, चिकन, मटन मासे उत्पादक, बेकरी व बेकरी पदार्थ उत्पादक, खाद्यतेल उत्पादक, बेव्हरेजेस उत्पादक, न्यूट्रासिटीकल व हेल्थ सप्लीमेंट उत्पादक व इतर अन्न पदार्थ उत्पादक यांच्यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी 8 ते 12 तास असून प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 30 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी अधिसूचित केलेल्या खाजगी प्रशिक्षण संस्था यांना निश्चित करून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. यानुसार कोणत्याही प्रशिक्षण संस्था जास्तीत जास्त संख्येच्या मर्यादा पेक्षा जास्त अन्न व्यवसायिकांना एकाच प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करू शकत नाही. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी पाळणे व अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. खाजगी प्रशिक्षण संस्था ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत नसल्यास अन्न व्यवसायिकांनी अन्न व औषध प्रशासन सांगली विभाग यांच्या कार्यालयास 0233-2602201/2 या दूरध्वनी क्रमांकावर, ईमेल - fdasangli@gmail.com किंवा प्रत्यक्ष कार्यालयास भेट देवून अवगत करावे, असे आवाहनही श्री. मसारे यांनी केले आहे. प्रशिक्षण अन्न व्यवसायिकांनी स्वतः घ्यावयाचे असल्याने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली किंवा अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित केले नाही. अन्न व्यवसायिक हे स्वतः प्रशिक्षण संस्थेची निवड व प्रशिक्षण शुल्क निश्चित करू शकतात. प्रत्येक अन्न व्यवसायिकांनी स्वतःच्या व्यवसायाचा प्रकारानुसार निश्चित केलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन संस्थेकडून प्रमाणपत्र घ्यावे. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून अन्न आस्थापनाची तपासणी दरम्यान प्रशिक्षण प्रमाणपत्राची तपासणी केली जाईल व ज्या अन्न व्यवसायिकांनी प्रशिक्षण घेतले नसेल अशा अन्न व्यवसायकांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे श्री. मसारे यांनी स्पष्ट केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा