सोमवार, २६ जून, २०२३

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांना 32 कोटीहून अधिक व्याज सवलत

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी बँकाकडून 3 लाख रूपये पर्यंतचे अल्प मुदती कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 वर्षाकरीता एकूण 1 लाख 92 हजार 33 शेतकऱ्यांना 32 कोटी 91 लाख 19 हजार 174 शेतकऱ्यांना व्याज सवलतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. अल्प मुदती कर्ज 3 लाख रुपये पर्यंत घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत (प्रत्येक वर्षी 30 जूनपर्यंत अथवा शासनाने अपवादात्मक परिस्थितीत कर्ज परतफेडीस मुदतवाढ दिली असल्यास तो दिनांक) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रूपये पर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास 3 टक्के प्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयकृत/ग्रामीण/खाजगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या कार्यालयात प्राप्त होतात. तद्नंतर या योजनेकरिता प्राप्त झालेल्या निधीतून कोषागाराकडून बील मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यारवर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेमुळे विहीत मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलतीची रक्कम प्राप्त होते. केंद्र शासनाकडूनही याच प्रकारची योजना राबविली जात असल्याने शेतकऱ्यांना 3 लाख रूपये पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज बिनव्याजी मिळते. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी विहीत मुदतीत कर्ज परतफेड करीत असल्याने वि.का.स. संस्था / बँकांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा