सोमवार, १२ जून, २०२३

नद्या अमृत वाहिन्या करणे प्रत्येकाची जबाबदारी चला जाणूया नदीला अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे आवाहन

सांगली दि. १२ (जिमाका) : चला जाणुया नदीला अभियानामध्ये राज्य शासनाने चांगली भूमिका घेतली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नद्या अमृत वाहिन्या करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडूया व अभियान यशस्वी करूया असे आवाहन चला जाणूया नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चला जाणुया नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, सहायक उपवनसंरक्षक अजित साजणे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, महाराष्ट्र राज्य जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व चला जाणुया नदीला अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य व नदी समन्वयक उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राबविण्यात येत असलेल्या चला जाणुया नदीला अभियानास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार या महत्वाकांक्षी उपक्रमाकडे अत्यंत गांभीर्याने पहात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी स्वत:ला झोकून देऊन काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नदी अमृत वाहिनी करण्यासाठी नदीचा नेमका आजार काय आहे, कोणत्या कारणांमुळे प्रदूषण होते, यासाठी संबंधित यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा. नदीला आपण आईची उपमा दिलेली आहे मात्र तिच्याशी व्यवहार चुकीच्या पद्धतीने करतो आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती करून नदी अमृत वाहिनी करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा डॉ. राणा यांनी व्यक्त केली. नदी स्वच्छ व अमृत वाहिनी करण्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी नदीचे काम उत्कृष्ट होत आहे. या कामासाठी केंद्र सरकारने पुरस्कार देऊन यामध्ये काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. अग्रणी नदी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या टीमचे त्यांनी अभिनंदन केले. चला जाणूया नदीला अभियानात लोक सहभाग वाढवून जिल्ह्यात अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना अपर उपजिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी दिल्या. अभियानातील एक सैनिक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी अभियानासंदर्भात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार काम करावे. जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत असेही त्या म्हणाल्या. श्री. चुग यांनी चला जाणूया नदीला अभियानासंदर्भात माहिती दिली. राज्यात या अभियानास शासन स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जल साक्षरतेच्या अभावामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. गाव पातळीवर याबाबत जनजागृती करून या अभियानाच्या माध्यमातून नद्या अमृत वाहिन्या करूया, असे त्यांनी आवाहन केले. चला जाणूया नदीला या अभियानात जन सहभाग घ्यावा, नदीच्या समस्या समजून घेऊन उपाय सुचावावेत. यासाठी प्रत्येक नदीची यात्रा करावी. या अभियानाचा शुभारंभ 13 जूनपासून करावा, अशा सूचना उपजिल्हाधकारी दीपक शिंदे यांनी दिल्या. तसेच चला जाणूया या अभियानामध्ये सांगली जिल्ह्यात उत्कृष्ठ काम केले जाईल असा विश्वास दिला. चला जाणुया या अभियानामध्ये जिल्ह्यातील अग्रणी, येरळा, माणगंगा, कृष्णा, तीळगंगा, महाकाली आणि कोरडा या सात नद्यांचा समावेश असून यासाठी नदीनिहाय केंद्रस्थ अधिकारी व नदी समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत नदी समन्वयक यांनी मनोगत व्यक्त करून अभियानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक सूचना केल्या. ००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा