बुधवार, २८ जून, २०२३

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जुलै

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून दिनांक 6 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नविन प्रशासकीय इमारत विजयनगर, मिरज रोड सांगली येथे संपर्क साधून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतित विहीत वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. या पुरस्कारांचे स्वरुप व अर्हता पुढीलप्रमाणे आहे. राज्यस्तरीय महिलांकरीता वैयक्तीक पुरस्कार (राज्यस्तरीय पुरस्कार ) - रोख रक्कम 1 लाख 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारास पात्र राहणार नाहीत. विभागीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार - रोख रक्कम 25 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 7 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणांपासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी. जिल्हास्तरीय पुरस्कार - रोख रक्कम 10 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक व्यक्ती /संस्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रेही सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, प्रस्ताव धारकाची माहिती व केलेल्या कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., सद्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाले काय? असल्यास तपशिल. विभागीयस्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय? असल्यास तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा