मंगळवार, ६ जून, २०२३

प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा - प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे

सांगली दि. 6 (जि.मा.का) : दीर्घायुष्य जगण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविली पहिजेत. वाहने व अन्य माध्यमातून होणारे प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखला पाहिजे, असे मत प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी जिल्हा न्यायालय आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना व जिल्हा न्यायालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या अध्यक्षतेखालही आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. आर. भदगले, पी.बी. जाधव, आर.एन. माजगांवकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. पोतदार, श्रीमती एम.एम. पाटील, श्रीमती एस. एस. काकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. एम. राव, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, सांगली मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्षः किरण रजपूत व वकील संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे म्हणाले, वाढत्या वाहनांमुळे, प्लॅस्टीकमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याचा परिणाम पाऊस व आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले आहे. त्यामुळे सर्वांनी आपआपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व ती जगविण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले पाहिजेत तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखला पाहिजे. कार्यकमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विरुपाक्ष कुलकर्णी, सचिन नागणे यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायालय सांगली येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा