शुक्रवार, १६ जून, २०२३

बालके मुलभूत हक्कापासून वंचित न राहण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी लक्ष देण्याची गरज - ॲड. सुहास कवठेकर

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : बालमजुरी ही देशातील एक गंभीर समस्या असून बालकांचे आरोग्य, शिक्षण अशा मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले जाते. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनाच्या नजरेस आणून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. सुहास कवठेकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक बालकामगार विरोधी दिन, बालकांचे हक्क व अधिकार या विषयावर कायदेविषयक शिबीर जिजामाता बालक मंदिर सांगली येथे आयोजित केले. याप्रसंगी ॲड. सुहास कवठेकर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ॲड. एस. एम. पखाली, डॉ. लताताई देशपांडे, मुख्याध्यापिका राजश्री डिगे, माजी प्राचार्य विजय कोगनोळे आदि उपस्थित होते. ॲड. पखाली म्हणाले, शिक्षण हक्क कायदा हा या देशात निर्माण केला असून लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. बालक ही आपली राष्ट्रीय संपत्ती म्हणूनच जपली गेली पाहिजे. लहान वयात मजुरी करताना काही दुखापत झाल्यास मूल आयुष्य भर दिव्यांग राहू शकते. याप्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री डिगे यांनी स्वागत केले, माजी प्राचार्य विजय कोगनोळे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नितीन ढाले यांनी केले. या कार्यक्रमास नितीन आंबेकर, सूरज कदम, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा