मंगळवार, १३ जून, २०२३

डी.एल.एड्. प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड्.) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना नोंदणीसाठी 13 जून पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा 27 जूनपर्यंत चालू राहणार आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी डी.एल.एड्. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयांची यादी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेशास इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान व एम्.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवारांना 12 वी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाची डाएट स्तरावरून 13 ते 28 जून या कालावधीत ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे. 3 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करून त्यावरील आक्षेपाचे निरसन करण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी पूर्ण भरलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 6 जुलै रोजी प्रथम प्रवेश फेरीतील उमेदवारांना प्रवेशासाठी 6 ते 10 जुलै असा कालावधी देण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश धेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डायट लॉगीनवर 10 जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 11 जुलै रोजी विकल्प देता येतील. 13 जुलै रोजी या फेरीची यादी जाहीर होईल. 13 ते 17 जुलै या कालावधीत या फेरीतील उमेदवारांना प्रवेश घेता येईल. 17 जुलै रोजी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी 18 जुलै रोजी विकल्प नोंदविता येणार आहेत. तिसऱ्या व अंतिम प्रवेश फेरीची यादी 20 जुलै रोजी जाहीर होणार आहे. या फेरीतील उमेदवारांना 20 ते 24 जुलै पर्यंत प्रवेश घेता येईल. चालू शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये प्रथम वर्ष 20 जुलै पासून सुरू होईल, असे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा