गुरुवार, २२ जून, २०२३

दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहिम सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मोटर वाहन कायदा 1988 मधील कलम 194ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी आपल्या कार्यालयीन आवारात विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना मज्जाव करावा, तसेच आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याबाबत अवगत करावे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यामध्ये ज्या व्यक्ती विना हेल्मेट प्रवेश करताना आढळून येतील त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली / शहर वाहतूक शाखा, सांगली यांच्याकडून मोटर वाहन कायद्यातील कलम 194ड नुसार कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहनही श्री. साळी यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा