बुधवार, १४ जून, २०२३

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह ‍निमित्त सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह दि. 10 ते 16 जून 2023 या कालावधीत साजरा केला जात असून यानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभिषन सारंगकर म्हणाले, दृष्टीआडची सृष्टी दाखविणारे डॉ. रामचंद्र भालचंद्र यांचा जन्म दिवस व मृत्यु दिवस 10 जून आहे. डॉ. रामचंद्र भालचंद्र यांनी त्यांच्या जवळजवळ 25 वर्षाच्या कारकिर्दीत 90 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. ते सामान्य जनतेत देवमाणूस म्हणून ओळखले जात, त्यांनी हैद्राबाद येथील मेडीकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण केले नंतर मुंबई विद्यापीठाचे एम. एस. डी. ओ. एम. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. याच काळात ते एक नावाजलेले नेत्रतज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेची शिबीरे आयोजीत केली व अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम) तथा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. गायत्री खोत, नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शैलजा सिनम, जिल्हा नोडल ऑफिसर तथा नेत्र चिकित्सा अधिकारी जे. जी. बाबर, नेत्र चिकित्सा अधिकारी आर. बी. कोथळे, लेखापाल अभिनंद पाटील तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा