सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी 14 टन अन्नपदार्थ पाकिटे व अन्य मदत रवाना

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. यावर सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली. एकाच दिवसात जिल्ह्यातून बिस्किट्स, दूध पावडर आणि भडंग असे एकूण 13 हजार 970 किलो अन्नपदार्थ पाकिटे जमा झाली आहेत. ही मदत घेऊन आज एक ट्रक रेल्वेद्वारे पुणे स्टेशन मार्गे केरळला रवाना झाला. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, मिरज तहसीलदार शरद पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
केरळमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत म्हणून सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले. मदत संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर कक्ष उघडण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक उपविभागीय कार्यालय आणि तालुका स्तरावरही प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये मदत संकलीत करण्यात आली.
चितळे उद्योग समूहाकडून दूध पावडर, बाकरवडी आणि भडंग देण्यात आले. पुरवठा विभागाच्या वतीनेही एक टन बिस्किट्स देण्यात आली. हुतात्मा उद्योग समूहाकडून 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच, आर्थिक स्वरूपात तीन लाख, 212 रुपये एकाच दिवसात जमा झाले.
सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पॅकिंग केलेले अन्नपदार्थ किंवा बिस्कीटस्‌ या स्वरूपात मदत जमा करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी यावेळी केले.
तसेच, आर्थिक स्वरुपात मदत करु इच्छिणाऱ्यांनी केरळ मुख्यमंत्री आपत्ती निवारण सहाय्यता केंद्र (सीएमडीआरएफ) खाते क्रमांक 67319948232, एसबीआय सिटी ब्रँच तिरुअनंतपुरम आयएफसी कोड - एसबीआयएन 0070028 या खात्यावर जमा करावी, असेही आवाहन करण्यात आले.
00000








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा