शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

जत तालुक्यातील बालगाव येथील कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : जागतिक योग दिनानिमित्त दि. 21 जून 2018 रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे  घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची ऐतिहासिक जागतिक स्तरावर नोंद झाली. या विक्रमाची नोंद यापूर्वीच हाय रेंज बुक, मार्व्हलस बुक, एशियन वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड अशा चार ठिकाणी झाली आहे. यामध्ये आता एका विक्रमाची भर पडली आहे. या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे आज कळवण्यात आले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, लिम्का बुकमध्ये झालेली नोंद ही जिल्हा प्रशासनासाठी मोठी उपलब्धी आहे. या कार्यक्रमाचे प्रेरणा स्थान असलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार. पालकमंत्री सुभाष देशमुख हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. गुरुदेवाश्रम, बालगावचे अमृतानंद स्वामी यांनी केलेल्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल त्यांचे आभार. या कार्यक्रमासाठी प्रशासन, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी योगदान दिले. या सर्वांचे मी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने मेहनत घेणारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे. जत तालुक्यातील महसूल, जिल्हा परिषदेचे संबधित अधिकारी, शिक्षण, क्रीडा यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, फिनिक्स संस्थेचे नितीन गवळी यांचे आभार शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तसेच, या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी सर्व नागरिकांचा मी आभारी आहे. प्रसारमाध्यमांचेही मी आभार व्यक्त करतो.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा