बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सांगलीत लवकरच वसतिगृह सुरू होणार वसतिगृहासाठी प्रस्तावित जागांची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पहाणी

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतला असून सांगली येथे येत्या 8 दिवसात वसतिगृहे सुरू करण्यात येतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात विविध ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली येथे वसतिगृहासाठी प्रस्तावित जागांची पहाणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यामध्ये त्यांनी मिरज येथील लोंढे कॉलनीतील महानगरपालिका हॉल सांगली येथील रघुनाथसिंग रजपूत विद्यामंदिर, महानगरपालिका शाळा क्रमांक 5 या ठिकाणांची पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव, महानगरपालिका उपायुक्त सुनिल पवार स्मृती पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहे त्याबरोबरच या समाजातील तरूण-तरूणींना फायदा व्हावा यासाठी शासन अनेक निर्णय घेत आहे. यामध्ये मराठा समाजातील तरूण-तरूणींसाठी वसतिगृहाची घोषणा शासनाने केली आहे. असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली येथे येत्या 8 दिवसात सर्व सोयींनीयुक्त दोन वसतिगृहे लवकरच सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येईल.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलने शांततामय मार्गाने करावीत, यामध्ये कोणताही हिंसाचार करू नये असे सांगून आत्महत्येमुळे कुटुंबाचे, राज्याचे, देशाचे नुकसान होते. त्यामुळे तरूणांनी या मार्गापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी याबाबतीत बोलताना सांगितले, मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय करण्यात आला असून सांगली येथील 100 फूटी रोडवरील साडेतीन एकराच्या जागेत वसतिगृह उभारण्यासाठीचा प्रस्ताव दोन दिवसात पाठविण्यात येत आहे. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र आदि सुविधाही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तत्पूर्वी मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ वसतिगृहे सुरू करण्यात येतील. त्यासाठी मिरज येथील लोंढे कॉलनीतील महानगरपालिका हॉल सांगली येथील रघुनाथसिंग रजपूत विद्यामंदिर महानगरपालिका शाळा क्रमांक 5 या ठिकाणांची पहाणी करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची सोय करण्यात येईल त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा