गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

राज्य शासन बळीराजाप्रती संवेदनशील - पालकमंत्री सुभाष देशमुख

विट्यात सुधारित पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

   सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : शेतकरी देशाचा खरा कणा आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, मातीपरीक्षण, बी-बियाणे, खते, पीककर्ज, हमीभाव अशा सर्वच बाबतीत राज्य शासन बळीराजाप्रती संवेदनशील आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
विटा येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कृष्णा पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, मनमंदिर उद्योगसमुहाचे अशोकराव गायकवाड, ऍ़ॅड. वैभवराव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, पाणीपुरवठा सभापती अरुण गायकवाड आदि उपस्थित होते.
सांगली जिल्हा वैभवशाली करायचा असल्याचे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनेक सकारात्मक बाबी करत आहे. शेतजमीनीचे आरोग्य टिकून राहण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका दिली जात आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी टेंभू योजनेसाठी 1200 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. विजेची गरज सौरउर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला शुद्ध बियाणे, कोणतीही प्रतीक्षा करायला लावता मुबलक प्रमाणात खतांचा पुरवठा करून खतांचा काळा बाजार थांबवला. शेतमाल तारण योजना राबवत आहोत. सहकारी बँकांच्या माध्यमातून आवश्यक कर्जपुरवठा आणि उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव अशा अनेक माध्यमांतून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
खासदार संजय पाटील म्हणाले, टेंभू योजनेचा केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यातून टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी 14 ते 15 महिन्यांत ही योजना पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न असून, लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अमरसिंह देशमुख, अशोकराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. ऍ़ड. वैभवराव पाटील यांनी राज्य शासनाने पाणीपुरवठा योजनेसह आतापर्यंत नगरपालिकेला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या बद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. तसेच, शहर आणखी सुंदर करण्यासाठी अपेक्षित बाबींची अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत सुधारित पाणी पुरवठा योजनेची किंमत 32 कोटी 62 लाख रुपये आहे. या योजनेत संपूर्ण शहरासाठी 12 लाख लिटर क्षमतेचा मुख्य संतुलन जलकुंभ, घुमट माळ परिसरासाठी 4.50 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, हराळे मळा, लक्ष्मीनगर, नवीन भाळवणी रोड, विवेकानंद परिसरासाठी 3.50 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, गांधीनगर, चंद्रसेन नगर मायाक्का नगर परिसरासाठी  2.60 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ, शहरातील वाढीव भागात 20 किलोमीटर नवीन वितरण व्यवस्था जलवाहिनी, घोगाव ते आळसंद जलशुद्धीकरण केन्द्र पर्यंत 10.75 किलोमीटरची जलवाहिनी बदलणे, आळसंद जल शुद्धीकरण केंद्र ते विटा 9.2 किलोमीटरची जलवाहिनी बदलणे, शहरातील विविध पाण्याच्या टाक्या भरणेकामी 12 किलोमीटर जलवाहिनी टाकणे या कामांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात दररोज समान दाबाने मानसी 135 लिटर पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
यावेळी स्वच्छ भारत अभियानात विटा नगरपरिषदेला देश राज्य पातळीवर उल्लेखनीय यश मिळवून दिल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच, वॉटर कप स्पर्धेत यशस्वी घाडगेवाडी, रेणावी, जाधववाडी आणि पानमळेवाडी या गावांना गौरवण्यात आले. यावेळी यावेळी उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उबरहंडे, गटविकास अधिकारी एस. टी. पवार, अविनाश चोथे, सुशांत देवकर, सुहास शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्थित होते.
प्रास्ताविक किरण तारळेकर यांनी केले. सूत्रसंचालन धीरज भिंगारदेवे यांनी केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा