सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाजासाठी सुसज्ज वसतिगृहाचे उद्घाटन

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन अत्यंत सकारात्मक असून सध्याचे शासन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईल. तोपर्यंत शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाप्रमाणेच भरघोस तरतुदी असतील, असे सांगून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या अत्यंत सुसज्ज अशा मराठा वसतिगृहांचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हा क्रीडा संकुलजवळ वसतिगृह सुरू करण्यात आले असून याचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आदि मान्यवर उपस्थित होते.
    मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रांमध्ये आरक्षणाइतकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त लाभ देण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विविध प्रकारच्या 605 अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची फी शासन भरत आहे. गतवर्षी 2 लाख 56 हजार विद्यार्थ्यांना 654 कोटी रूपयांचा लाभ शिक्षण शुल्काच्या 50 टक्के  रक्कमेच्या स्वरूपात देण्यात आला. यावर्षी जे संस्थाचालक 50 टक्के शिक्षण शुल्कामध्ये प्रवेश देणार नाहीत, त्यांच्या मान्यता रद्द करण्यात येतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के शिक्षण शुल्क भरले असेल त्यांची 50 टक्के रक्कम शासनाने परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यासाठी तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    येत्या महिन्याभरात 10 जिल्ह्यांमध्ये वसतिगृह सुरू होत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची निःशुल्क निवास व्यवस्था करण्यात येईल. तसेच वसतिगृह चालविणाऱ्या संस्थांना ग्रामीण भागात 8 हजार रूपये तर शहरी भागात 10 हजार रूपये प्रति विद्यार्थी देण्यात येतील, असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यात 500 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने 10 लाख रूपये कर्जाच्या रक्कमेचे 3 लाख 25 हजार रूपयांचे व्याज शासन भरेल व्यवसाय निर्मितीसाठी दरवर्षी 10 हजार तरूण-तरूणींना विनातारण कर्ज देण्यात येईल. कर्जाची थकहमीही शासन घेईल, असे सांगून मराठा समाजातील तरूणांनी उद्योजक व्हावे रोजगार निर्मितीत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली असल्याची सांगून मराठा समाजातील जे विद्यार्थी पीएच.डी शिक्षणासाठी परदेशी जातील त्यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
    यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त होईल त्याच्या आधारे आरक्षणाचा सक्षम कायदा करण्यात येईल. हे आरक्षण टिकणारे असेल, लोकांनी विश्वास ठेवावा, असेही आवाहन केले.
    यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत लोकोपयोगी नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी वि. ना. काळम यशस्वीपणे राबवित असल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यामध्ये केरळ पूरग्रस्तांसाठीची संकलित केलेली मदत, बालगाव येथे राबविण्यात आलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झालेला सूर्यनमस्कार उपक्रम, सुसज्ज इमारतीत मराठा वसतिगृहाची सुरूवात या बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर यांचेही कौतुक केले.
    जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह सुरू करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिणामकारक सुरू असल्याचे सांगून या ठिकाणी 60 विद्यार्थ्यांची सुविधा करण्यात येत आहे. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रवेशासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
    मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विलासराव देसाई यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचा सत्कार करून प्रत्येक तालुक्यात वसतिगृह व्हावे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी जागा द्यावी, मागासवर्गीय आयोगाचे काम महिन्याभरात पूर्ण करावे मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी केले. स्वागत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थी हर्षद कवडे याने मनोगत व्यक्त केले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ओळखपत्र वितरीत करण्यात आले. आभार अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी मानले.
    यावेळी मिरज तहसिलदार शरद पाटील, महानगरपालिका उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, समित पाटील, ऍ़ड. उत्तमराव निकम, विलासराव देसाई, नितीन चव्हाण, डॉ. संजय पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा