शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 226 योजना मंजूर - पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत

    सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सण 2018-19 मध्ये सांगली जिल्ह्यासाठी 226 योजना मंजूर केल्या आहेत. त्यासाठी जवळपास 466 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजना पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी, पणन, स्वच्छता ग्रामीण पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
इस्लामपूर येथे पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. एन. गरंडे, कार्यकारी अभियंता जी. ए. पाटील, इस्लामपूरचे उपअभियंता आर. व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. कांबळे, उपअभियंता जी. एच. पाटील,एन. पी. कोरे,राजू कांबळे, श्री. पवार यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
आपली जडणघडण झालेल्या तालुका जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन पाणीपुरवठा राज्य मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, वाळवा तालुक्यासाठी आतापर्यंत 10 पेक्षा अधिक योजना मंजूर केल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात 33 योजना मंजूर केल्या आहेत. त्यासाठी जवळपास 65 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. त्यातील पेठ पाणीपुरवठा योजना सर्वात मोठी असून, या योजनेसाठी जवळपास 15 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. तसेच, नेर्ले,  कासेगावसाठीही पाणीपुरवठा योजना मंजूर केला आहेत. शिराळा तालुक्यात 23 योजनांसाठी जवळपास 19 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, त्यांनी विहित मुदतीत या योजना कार्यान्वित होण्यासाठी काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सन 2017-18 मध्ये 20 योजना मंजूर केल्या आहेत. प्रादेशिक कासेगाव इतर गावे योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी सात कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा