शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

नागपंचमी उत्सव साजरा करताना नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे - अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. मात्र लोकपरंंपरेला धरून आणि कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. नागरिकांनी नवीन संकल्पना, विचार, उपक्रम राबवावेत. हा उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नका, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी आज येथे केले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी सणाच्या आयोजनासाठीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. भारतसिंह हाडा, वाळवा - शिराळ्याचे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) महेश्वर रायकर, शिराळ्याचे प्रभारी तहसीलदार के. जे. नाईक, शिराळ्याचे मुख्याधिकारी अशोक कुंभार, शिराळ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. ए. कोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता भा. सु. बिराजे, मानद वन्यजीवसंरक्षक तथा जनहितयाचिकाकर्ते अजित पाटील, व्याघ्र कक्ष समितीचे  प्रदीप सुतार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाला शिराळ्यातील नागरिकांच्या धार्मिक भावनेचा आदर आहे. मात्र आपण सर्व कायद्याचे बांधील आहोत, असे सांगून अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, नागपंचमी सण साजरा करताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. मात्र, जनतेच्या धार्मिक भावनांचा अनादर होऊ नये, याचीही खबरदारी घ्यावी. धार्मिक भावना आणि कायदा या दोन्ही बाबींचा आदर ठेवावा. तसेच, याबाबतीत नागरिकांसाठी पर्यटकांसाठी मदत कक्ष उपलब्ध करून द्यावा. प्रशासकीय यंत्रणेने गावकऱ्यांच्या समन्वयाने चांगल्या पद्धतीने नागपंचमी उत्सव साजरा करावा. तसेच, आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या दृष्टीने सतर्क तत्पर राहावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण म्हणाले, नागरिकांनीही जिवंत नागाची पूजा करू नये. नागपंचमी सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ध्वनीक्षेपणाची मर्यादा ओलांडू नये. कायद्याचे उल्लंघन करता हा उत्सव साजरा करावा. याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. 
उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी शिराळ्यामध्ये नागमंडळांची बैठक घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच, यासाठी वनविभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत, अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी आगार, अंबामाता मंदिर ट्रस्ट, महावितरण या विभागांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एखादी आपत्ती घडू नये यासाठी खबरदारी पूर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उपअधीक्षक (गृह) महेश्वर रायकर म्हणाले, शिराळ्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे गत वर्षी एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. यावर्षीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. यावर्षी 4 पोलीस उपअधिक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 480 पोलीस कर्मचारी, 50 वाहतूक पोलीस, 60 महिला पोलीस कर्मचारी, 20 व्हिडीओग्राफर, 30 वाहने आणि 11 ध्वनीमापक यंत्रे असा चोख बंदोबस्त पोलीस विभागातर्फे ठेवण्यात आला आहे.
नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी नागपंचमी उत्सव शांततेत पार पाडू, अशी ग्वाही दिली. मानद वन्यजीवसंरक्षक तथा जनहितयाचिकाकर्ते अजित पाटील यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे, असे मत मांडले.
    
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा