सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची जिल्हाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचे केले अभिनंदन

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण, कल्याणकारी उपक्रमांबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचे अभिनंदन केले.
अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधीलकीतून राबविलेल्या जात असलेल्या होप या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेवून या माध्यमातून करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रिया, उपक्रमाची उपयुक्तता जाणून घेतली या अभिनव संकल्पनेबद्दल जिल्हाधिकारी काळम यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी सांगली जिल्ह्यातून अत्यंत अल्प कालावधीत केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी बिस्किट्स, दूध पावडर अन्य सीलबंद अन्नपदार्थ याबरोबरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठी मदत संकलीत करून केरळला रवाना केली. याबद्दलही त्यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी गिरीश बापट यांना गतीमान प्रशासनासाठी सांगली जिल्ह्यातील 10 तहसिल कार्यालये, 5 उपविभागीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय यांना आसएसओ मानांकन प्राप्त झाल्याची माहिती दिली. यासाठीही त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच बालगाव येथे योग दिनानिमित्त झालेल्या सूर्यनमस्कार कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉड, हाय रेंज बुक, मार्व्हलस बुक, एशियन वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया रेकॉर्ड या पाच ठिकाणी जागतिक स्तरावर झाली आहे याबद्दल अभिनंदन करून बायोमेट्रिक पध्दतीने अन्नधान्य वितरणाचे काम जिल्ह्यात 87 टक्के झाले असून ते लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करावे असे सांगितले. सांगली जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी महिन्याभरात आपण पुन्हा येवू असे आश्वासनही गिरीश बापट यांनी यावेळी दिले.
सदर सदिच्छा भेटी प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा