गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

टेंभू उपसा योजना आणि लोकसहभागातून आटपाडी तालुक्याची कायापालटाकडे वाटचाल

सांगली जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भागातील क्षेत्रास सिंचन सुविधा पुरवण्यासाठी उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. प्रकल्पात टेंभू, ताकारी, म्हैसाळ या तीन प्रमुख मोठ्या उपसा सिंचन योजना आहेत. त्यातील टेंभू उपसा सिंचना योजना आटपाडी तालुक्यासाठी वरदान ठरली आहे.
कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक दिवसांपासून रखडलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 1200 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. ही कामे एक वर्षात पूर्ण होतील, याची दक्षता घेण्यात येत आहे.
दुसरीकडे जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजना यासारख्या शासकीय योजनांना लोकसहभागाची साथ मिळाली. त्यातून आटपाडी तालुक्याची कायापालटाकडे वाटचाल सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनेतून बाळेवाडी पिसाळ वस्ती पाझर तलावाच्या खोलीकरण कामासाठी 11 लाख रुपये मिळाले. तिथून पुढे रोजगार हमी योजनेतून बाळेवाडी ओढ्याचे खोलीकरण करण्यासाठी पाच लाख रुपये अशी दोन कामे करण्यात आली. त्या ओढ्यावर एकूण 9 बंधारे आहेत. त्यातील 3 बंधाऱ्यांतील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.
दुष्काळावर मात करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले. खानापूर विधानसभेचे आमदार अनिलराव बाबर यांनी पावसाळ्यात वाहून जाणारे नदीतील पाणी दुष्काळी भागाला मोफत मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राज्य शासनाने दखल घेत, टेंभू योजना कार्यान्वित करून दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी या पाण्याचा मोफत लाभ शेतकऱ्यांना मिळाला. शिवाय आटपाडी तालुक्यातून माणगंगा नदीतून हे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत पोहोचले. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आपआपल्या परीने यात भर घातली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाबी तडीस लावण्यास मेहनत घेतली.
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर या बंधुंनी स्वखर्चाने झरे येथील जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा कालवा काढला. टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाल्यावर याचा सुपरिणाम दिसू लागला. परिसरातील भूजल पातळी वाढली. गावच्या आसपासच्या परिसरात पाणी पोचले. आटपाडी तालुक्यात लोकसहभागातून पोटकालव्यांचे जाळे निर्माण झाले. खरसुंडीपासून ते बाळेवाडी हद्दीपर्यंत कालव्यांची विविध कामे लोकसहभागातून झाली. यंत्रासाठी लागणारे तेल आणि ब्लास्टींगसाठी लोकवर्गणी काढण्यात आली.
राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अडीच ते 3 किलोमीटर काम कुरूंदवाडीत केले. त्याचबरोबर लोकसहभागातून नागरिकांच्या घामाचे मोती झाले. बनपुरी - बाळेवाडी तलावांतर्गत खरसुंडीपासून 4 किलोमीटर 10 फूट खोल पोटकालवा काढण्यात आला. निंबवडे तलावातून काढलेल्या पोटकालव्यातून आवळाई, गळवेवाडी आणि शेरेवाडी तसेच, पोटकालव्याच्या 600 मीटर पोटकालव्यातून मापटे मळा आणि पुजारवाडीला लाभ झाला. मिटकी परिसरात 7 बंधारे बांधले. 2 पाझर तलाव आणि 2 नालाबांध बांधले आहेत.
बनपुरी विकास सोसायटीचे अध्यक्ष विठोबा पुकळे, ग्रामपंचायत सदस्य महादेवअप्पा पाटील, माजी सरपंच राजाराम यमगर, विद्यमान सरपंच सुरवंता यमगर, पोलीस पाटील हणमंत पाटील यांचे सहकार्य लोकवर्गणी संकलनासाठी झाले.
अहिल्यादेवी पाणीवापर संस्था, बनपुरीचे सचिव दत्तू यमगर म्हणाले, टेंभू योजनेच्या पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या या कामांमुळे स्थलांतर थांबले आहे. पूर्वी एका टेंपोत जवळपास 25 असे 7 टेंपो भरून नागरिक स्थलांतर करत असत. आता गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे 80 टक्के स्थलांतर थांबले आहे. पूर्वी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या 70 टोळ्यांची संख्या आता जेमतेम 5 आहे. पशुधन वाढले आहे. दुग्धव्यवसायातही वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर आम्ही बाळेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली आहे. प्रत्येकाला एक वर्ष सरपंचपद देऊन निवडणुकीसाठी होणारा खर्च या कामांसाठी वापरला आहे.
बाळेवाडीचे सरपंच श्रीमंत खताळ म्हणाले, बाळेवाडी तलावातून 16 ते 18 फूट खोल आणि 7 फूट रूंद साडेचार किलोमीटर कालवा काढण्यात आला आहे. त्यामुळे बाळेवाडी परिसरातील 600 एकर जमीन पाण्याखाली आली आहे. या गावात 7 वर्षे टँकर होता. आता टँकरची आवश्यकता नाही. पूर्वी आम्हा माणदेशवासियांना कृष्णामाईचे पाणी बघायला धार्मिक स्थळी जावे लागत असे. आता, कृष्णामाई आमच्या अंगणात आली आहे.
याबाबत भारत यमगर म्हणाले, माझी 18 एकर शेती आहे. या कामांमुळे माझे 2 एकर ऊसक्षेत्र आहे. त्याचबरोबर बाळेवाडी परिसरात बागायती पिके, मका, कापूस होऊ लागला आहे. परिसरातील 110 विहिरी तुडुंब आहेत.
एकूणच टेंभू उपसा सिंचना योजना आणि तिला मिळालेली लोकसहभागाची साथ यामुळे आटपाडी तालुक्यात बदल होत आहे.
            संप्रदा बीडकर
                              माहिती अधिकारी
                 सांगली
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा