शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

सोयाबीन पीक कीड व्यवस्थापन

सोयाबीन हे महत्वाचे तेलबियाचे पीक असून यात तेलाचे प्रमाण 20-21 टक्के प्रथिनाचे प्रमाण 40-42 टक्के आहे त्यामुळे सोयाबीन हे प्रथिनाचा सधन स्त्रोत समजाला जातो. सोयाबीन मधील तेल काढून घेतल्यानंतर उर्वरीत तेलमुक्त सोयापिठला बाजारपेठेत फार मोठी मागणी आहे. सध्या सोयाबीन पिकावर विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यापासून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सोयाबीन पिकातील कीड रोगा संबंधीत त्यावरील उपाययोजना खालील प्रमाणे कराव्यात.
सोयाबीन पिकावर आढळणाऱ्या प्रमुख किडी
खोडमाशी - ही पिकावरील महत्वाची कीड असून  खोडमाशीची मादी सोयोबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले शेंगाचे प्रमाण कमी होते.
तंबाखुवरील पाने खाणारी अळी - अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन 70 टक्क्यापेक्षा जास्त घटते.
बिहार सुरवंट - सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुंजक्याने राहतात पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात पूर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो नंतर तो राखाडी होतो.
पाने पोखरणारी अळी - कमी पाऊस कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात वाढ पूर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते नंतर सुकून गळून पडते.
पाने गुंडाळणारी अळी - सतत पाऊस ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात पाने आकसली जातात.
मावा - ढगाळ पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानाच्या मागील बाजूस खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयोबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
शेंगा पोखरणारी अळी - ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे. कीडीच्या अळ्या सुरवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेंगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.
हिरवा ढेकूण - ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयोबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
हुमणी - ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात. त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात मरतात. अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात. पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब बाभळीची पाने खातात शेणखतात अंडी घालतात. शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते.याखेरीज महाराष्ट्रात सोयोबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.
पांढरी माशी - ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
चक्रभुंगा - या किडीची अळी पिवळसर पांढरी, गुळगुलीत, बिनपायाची असून तिच्या डोक्याकडील भाग जाड असतो. पुर्ण वाढलेली अळी 19 ते 22 मिमी लांब असते. चक्री भुंगेरा फांदी, देठ मधल्या पानाच्या देठावर 2 चक्राकाप तयार करतो मधल्या भागात 3 छिद्र पाडून मादी त्यापैकी एका छिद्रात अंडी घालते. परिणामी चक्राचा वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी खोड पोखरून पोकळ करते. कीडग्रस्त झाड सुरुवातीला इतर झाडांसारखेच दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्री भुंग्यामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्यांच्या संख्येत आणि वजनात 50 ते 60% पर्यंत घट येऊ शकते.
हिरवी उंट अळी - या किडीचे मादी पतंग सतत 5 दिवस दररोज 40 अंडी रात्रीच्यावेळी पानाच्या मागील पृष्ठभागावर घालते. 2 - 4 दिवसात अंड्यातून निघालेली फिकट हिरव्या रंगाची ही अळी शरीराचा मधला भाग उंच करून चाटते. उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यानंतर सर्व भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. अळ्या फुलांचे शेंगांचे प्रचंड नुकसान करतात.
कीडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर
     खोडमाशीच्या नियंत्रणासाठी 10 टक्के दाणेदार फोरेट प्रती हेक्टरी 10 किलो या प्रमाणात पेरणीपुर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या किटकनाशकाची 3 ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे. पाने खाणाऱ्या, पाने पोखरणाऱ्या गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथोफेनप्राँक्स 10 इ.सी. 1 लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली किंवा एन्डोसल्फान 35 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथिऑन 50 इ.सी. 1.5 लीटर किंवा मेथोमिल 40 एस.पी. 1 किलो 1 किलो या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांचा भुकटीच्या देखील हेक्टरी 20-25 कीलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.
     रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटाँन (0.03 टक्के) किंवा फॉस्फोमिडाँन (0.03 टक्के) किंवा डायमेथोएट (0.03 टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.  हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी 10 टक्के लिंडेन किंवा 2 टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळल्यास 60 किलो प्रती हेक्टरी 5 टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी जमिनीत मिसळावी.
सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग त्यांचे नियंत्रण
 तांबेरा -  सतत पाऊस ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगाचा इतर भागात प्रसार होतो. या रोगामुळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकाची वाढ मंदावते पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.
करपा - या रोगाच्या प्रादुर्भाव झालेली रोपे कोलमडून पडतात मरतात. जमिनीजवळ खोडावर पांढरी बुरशी आढळून येते. शेतातील बुरशीग्रस्त भाग हा रोगाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो. अशा भागाला प्रति हेक्टरी 20 किलो क्लोरबेनच्या द्रावणाने भिजवून प्रक्रीया करावी.
पानावरील ठीपके - बुरशीच्या निरनिराळ्या रोगजनक प्रजातीमुळे पानांवर पिवळे, लालसर, तपकीरी, बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठीपके आढळून येतात. बुरशीनाशकांच्या फवारणीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी कार्बेन्डँझिम, डायथेन एम 45, डायथेन झेड 78 ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
मुळकुज आणि खोडकुज - या रोगाची लागण जमिनी लगतच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची आणि मुळाची साल रोगग्रस्त   झाल्यामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही. त्यामुळे पाने पिवळी गळून पडतात. अशी रोपे मरतात आणि जमिनी लागतच कोलमडतात.
कॉलर रॉट - या रोगामुळे जमिनीलगतचे खोड मुख्य मुळे काळपट होऊन सडल्यासारखी दिसतात. त्याची साल तागाच्या तंतुसारखी निघून जाते. रोगट भागावर भोवतालची कापसाच्या तंतुसारखी बुरशीची वाढ होते आणि मोहरीसारखी बुराशिफळे तयार होतात. रोगट झाड मलून होऊन लवकर वाळते.
मोझक/पिवळा मोझक - या रोगात झाडाच्या पानाचा काही भाग पिवळा काही भाग हिरवा दिसतो रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी लागतात त्याही खुरटलेल्या असतात.
सोयाबीन किड आणि रोगाची एकीकृत व्यवस्थापन
शेताची नांगरट - उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अळ्या कोषांचा नाश होतो. तसेच बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा नाश होतो.
फेरपालटीची पिके - खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर रब्बी अगर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे पीक घेऊ नये. कारण तसे केले असता किडी रोगांच्या जीवनक्रमात खंड पडत नाही पुढील पिकावर त्यांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने सोयाबिन-ऊस, सोयाबिन-गहू असा पिकांचा क्रम योग्य ठरतो.
रोग किडग्रस्त झाडे किडी नष्ट करणे - शेतामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन रोग किडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. तसेच किडींच्या अंडी, अळी या अवस्था अल्पप्रमाणात आढळून आल्यास त्या गोळा करून त्यांचा केरोसीन किंवा कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नायनाट करावा.  विशेषतः  लष्करी  अळी  या  किडीच्या अंड्यांचे पुंजके, बिहार सुरवंट या किडींच्या अळ्या यांचे या पध्दतीने नियंत्रण परिणामकारक ठरते.
शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा (Bird Perches) करणे - किडीच्या अळ्या, पिल्ले पुर्ण वाढ झालेले किटक हे पक्ष्यांचे नैसर्गीक खाद्य असते. शेतात ठरावीक अंतरावर अंदाजे हेक्टरी 100 ठीकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी 10-15 फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परीणामकारकरित्या नियंत्रण होते रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.
प्रकाश सापळा वापरणे  - रात्रीच्या वेळी शेतात 200 वॅटचा दिवा लावून त्याखाली केरोसीन मिश्रीत पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षिच होणारे कीटक मरतात. मेलेल्या किटकांमध्ये हानीकारक किटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादूर्भावाचे भाकीत करता येते वेळीच उपाययोजना करता येते.
कामगंध सापळा वापरणे - सोयाबिन पिकावरील लष्करी अळी शेंगा पोखरणारी अळी या कीडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकीत करण्यासाठी देखिल होतो.
परोपजीवी कीटक ( Predators and Parasites ) - यामध्ये घातूक लशी (Viruses) परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक जिवाणू (Fungi and Bacteria) यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या कीडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक घातूक लस, लष्करी अळीवरील घातूक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बँसिलस थुरीजिएन्सीस बॅव्हेरीआ बँसिआना या जिवाणुची किटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. सध्या त्यांची किंमत रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जास्त असली तरी त्यांचा वापर परीणामकारक ठरतो. रोग नियंत्रणासाठी देखिल ट्रायकोडर्मा विरीडी स्युडोमोनास फ्लोरेसेन्स यांचा वापर असल्याचे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.
रासायनिक कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा समतोल वापर - वरील सर्व गोष्टींचा अवलंब करून देखील किडी रोगांना अनुकुल हवामान मिळाल्यास त्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रसायनांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात योग्य पध्दतीने वापर करणे शहाणपणाचे ठरते. हानीकारक कीटकांची संख्या त्यांच्यामुळे होणारी हानी यांचे प्रमाण ठरावीक पातळीपेक्षा जास्त झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे लागतात. निरनिराळ्या किडीसाठी संशोधन करून या पातळ्या निश्चित केल्या आहेत. उदा. खोडमाशीसाठी 26 टक्के खोड पोखरलेली लांबी एकूण झाडाच्या उंचीचा प्रमाणात असणे, उंट अळीसाठी एक मीटर लांबीच्या ओळीत 1-2 पेक्षा जास्त अळ्या आढळणे इ. तांबेरा रोगासाठी पीक फुलावर असतांना बुरशीनाशकाची एक प्रतीबंधात्मक फवारणी करणे सांगली कोल्हापूर भागात आवश्यक ठरते.
     वरील सर्व बाबींचा विचार करून काटेकोरपणे रोग किडींच्या नियंत्रणासाठी नियोजन करणे यालाच एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Management ) असे म्हणतात.

                                                सुरेश मगदूम
                                                प्रकल्प उपसंचालक (आत्मा)
                                                सांगली
                  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा