सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

सांगलीकरांच्या मदतीतून केरळ आपद्ग्रस्तांना दिलासा - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

- केरळ आपद्ग्रस्तांसाठी मदतीचा ट्रक रवाना
- आजपर्यंत 13 लाख 30 हजार 166 रुपये आर्थिक स्वरूपात मदत

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : संकट हे कुणाच्याही हातात नसते. मात्र, संकटकाळी, आपत्तीवेळी मदत करणे हे आपल्या हातात असते. केरळ आपद्ग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे आले. यातून केरळमधील आपद्ग्रस्तांना ते एकटे नसल्याचा विश्वास दिला आहे. सांगलीकरांनी दिलेल्या मदतीतून केरळ आपद्ग्रस्तांना दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
केरळमधील आपद्‌्ग्रस्तांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले. त्यानंतर सांगली जिल्हा प्रशासनाने उत्फूर्तपणे राबवलेल्या मदत मोहिमेतून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज आणखी एक ट्रक रेल्वेद्वारे पुणे स्टेशन मार्गे केरळला रवाना झाला. त्यापूर्वी नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या ज्या वेळी आपत्ती आली, त्या त्या वेळी आपल्या समाजाने दातृत्त्व दाखवले आहे. इतरांच्या कल्याणासाठी जगण्याची आणि प्रसंगी मरण पत्करण्याची आपली परंपरा आहे. आपत्तीच्या वेळी जात, पंथ, पक्ष विसरून एकदिलाने मदत करण्यासाठी सारा देश एकत्र येतो. ही वृत्ती सदासर्वकाळ निर्माण करण्याची गरज आहे.
केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केल्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीकरांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच, यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे 4 लाख, 47 हजार रुपये तसेच, निशिकांत पाटील यांच्या वतीने 90 हजार 500 रुपये, एन. आय. सी. टीमच्या वतीने 6 हजार रुपये ही मदत धनादेश धनाकर्षाद्वारे, महानगरपालिकेच्या बचतगटांच्या वतीने वस्तुरुपी मदत देण्यात आली.
केरळ आपद्ग्रस्तांसाठी अल्प काळात उभारण्यात आलेल्या मदतीची माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आण्णासाहेब चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी केले.
केरळ आपद्ग्रस्तांसाठी आज पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये 656 किलोग्रॅम बिस्कीटपुडे, 10 किलोग्रॅम दूध पावडर, स्टेशनरी, कपडे 500 किलोग्रॅम, औषधे 410 किलोग्रॅम 23 टन साखर यांचा समावेश होता. तसेच आजपर्यंत 13 लाख 30 हजार 166 रुपये आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन ट्रकद्वारे जवळपास जवळपास 15 टन हून अधिक बिस्किट्स, दूध पावडर अन्य सीलबंद अन्नपदार्थ आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवले आहेत. मदत संकलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर कक्ष उघडण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक उपविभागीय कार्यालय आणि तालुका स्तरावरही प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये मदत संकलीत करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी आणि  मिरज तहसीलदार शरद पाटील, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा