शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

समाजाला दिशा देण्याचे विलिंग्डन महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

विलिंग्डन महाविद्यालयाच्या प्रकल्पांना भरीव निधी देणार
   
सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाने गेल्या 100 वर्षात समाजाला दिशा देण्याचे दिशा देणारी माणसे घडविण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद असून सर्वच शिक्षण संस्थांनी समाजाची गरज ओळखून प्रबोधन करावे. कृत्रिम बुध्दीमतामुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बेरोजगारी वाढत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी उद्योगाभिमुख कौशल्य आधारीत अभ्यासक्रम सुरू करण्याची जबाबदारी डेक्क्न एज्युकेशनसारख्या संस्थांनी पार पाडावी, अशी अपेक्षाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शताब्दी महोत्सवी वर्षामध्ये विलिंग्डन महाविद्यालयाच्या राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव शुभारंभ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विकास नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर होते. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ श्रीकृष्ण कानेटकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशारे पंडित, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सागर फडके, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवत्तावाण विद्यार्थी घडविण्याची विलिंग्डन महाविद्यालयाची फार मोठी परंपरा असून शताब्दी महोत्सवात महाविद्यालाने विद्यार्थी, समाज यांना उपयुक्त ठरणारे कार्यक्रम उपक्रम राबवावेत. संस्थेच्या प्रकल्पांना शासन भरीव निधी देईल असे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होत असलेल्या बेरोजगारीवर मात करून तरूणांना नोकरी, उद्योग यांची संधी निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास आधारीत 6 विद्यापीठे सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले विद्यापीठ चंद्रपूर येथे सुरू करण्यात येत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीनेही असे विद्यापीठ सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
बेरोजगारी संपविण्यासाठी शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल होणे आवश्यक असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व शैक्षणिक संस्थांनी उद्योग, रोजगाराभिमुख शिक्षणावर अभ्यासक्रमावर भर द्यावा, महाविद्यालयांनी प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट सेंटर सुरू करावे. विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक बदल घडवावेत असे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डेक्कन एज्युकेशन सोयासटीने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना प्रगतीची नवी दिशा, आशा दिल्याचे सांगून बदलत्या काळात शिक्षण संस्थांनी शैक्षणिक प्रवाहाला कौशल्य शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन या चतु:सुत्रीची जोड द्यावी. शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे विद्यार्थ्याशी सुसंवाद साधावा, असे सांगितले. विलिंग्डन महाविद्यालयाने या परिसरातील महाविद्यालये विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी प्रारूपे राबवावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खासदार संजय पाटील म्हणाले, ग्रामीण कष्टकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना विलिंग्डन महाविद्यालयाने ज्ञानार्जन केले अनेक पिढ्या घडविल्या. आपल्या सामाजिक जीवनातील जडणघडणीमध्ये या महाविद्यालयाचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. महाविद्यालयाच्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीला एज्युकेशन हब म्हणून विकसीत करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येतील असे सांगून महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन संस्थेने 135 वर्षांचा कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणे ही शैक्षणिक क्षेत्रातील मोठी वाटचाल असल्याचे सांगून सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या समाजाभिमुख, विद्यार्थीभिमुख उपक्रमांसाठी संस्था नेहमीच पाठीशी राहील असे सांगितले. महाविद्यालयाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत व्हावी यासाठी संस्थेच्या विविध उपक्रमांना माजी विद्यार्थ्यानी सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. ताम्हणकर यांनी स्वागत प्रास्ताविक करनाना संस्थेच्या 100 वर्षाच्या इतिहासाचा आढावा घेतला शताब्दी महोत्सवामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेबद्दल माहिती दिली. सागर फडके यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मानसी दिवेकर यांनी केले. आभार प्राध्यापक राजकुमार पाटील यांनी मानले.
यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वचा अमिट ठसा उमटविलेले माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा