बुधवार, २० मार्च, २०१९

निवडणूक प्रयोजनार्थ खर्चाच्या 15 प्रवर्गांतील 279 बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या संदर्भात निवडणूक खर्च कामकाजाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक बाजारपेठेमध्ये सर्वेक्षण करून दरपत्रके मागवून आणि संबंधित सक्षम अधिकृत अभिकरणांकडून प्राप्त झालेल्या बाबनिहाय दरासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तसेच त्यांचा सूचना विचारात घेवून 44-सांगली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रयोजनार्थ करण्यात येणाऱ्या खर्चाच्या विविध 15 प्रवर्गामधील 279 बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
    जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राजकीय पक्षांद्वारे निवडणूक प्रयोजनार्थ निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापर्यंत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र अचूक लेखा (हिशेब) विहीत नमुन्यात विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो निवडणूक आयोगास सादर करणे अनिवार्य आहे. राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याव्दारे निवडणूक प्रयोजनार्थ करण्यात येणाऱ्या सर्व खर्चाचे निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेमार्फत सनियंत्रण आणि परिनिरीक्षण केले जाणार आहे. अधिसूचित करण्यात आलेले प्रमाणति दर आधारभूत मानून सर्व लेखांकन चमूंनी उमेदवारांच्या संदर्भातील अभिरूप निरीक्षण नोंदवहीमध्ये खर्चाच्या नोंदी घेण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
    लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77(1) अन्वये विहीत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख आणि निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह यादरम्यान त्याने केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र अचूक लेखा (हिशेब) विहीत नमुन्यात विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो वेळोवेळी तपासणीसाठी प्राधिकृत यंत्रणेस उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा