सोमवार, २५ मार्च, २०१९

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची सरमिसळ


सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 4 हजार 995 बॅलेट युनिट, 3 हजार 110 कंट्रोल युनिट तर 3 हजार 305 व्हीव्हीपॅट मशिन्स पूर्ण तपासणीअंती उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व मशिन्सचे विधानसभा मतदारसंघ निहाय वाटप करण्यात आले. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे सरासरी 25 टक्के अधिक तर व्हीव्हीपॅट मशिन्सचे सरासरी 33 टक्के अधिक वाटप करण्यात आले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देण्यात येणाऱ्या मशिन्सची यावेळी संगणकीय प्रणालीद्वारे सरमिसळ करण्यात येऊन त्याच्या याद्या राजकीय पक्ष सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना देण्यात येणार आहेत. 28 तारखेस वैरण बाजार गोडावून मिरज येथून या मशिन्स सर्व विधानसभा मतदारसंघाला पाठवण्यात येतील. त्यावेळीही राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधी उपस्थित ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा