बुधवार, २७ मार्च, २०१९

नामनिर्देशन प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक 10 मार्च 2019 पासून निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आज दिनांक 28 मार्च 2019 पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, 281-मिरज विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राजेंद्र गाडेकर आदिंची उपस्थिती होती.
    तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारांची नामनिर्देशन प्रक्रिया दिनांक 28 मार्च 2019 पासून सुरू होत असून नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात  स्विकारण्यात येणार आहेत.          पद निर्देशित सहायक निवडणूक अधिकारी म्हणून 281-मिरज विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी यांना घोषित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत त्या अर्ज स्विकारतील असे यावेळी सांगण्यात आले. नामनिर्देशन प्रक्रिया कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 100 मिटरच्या परिसरात केवळ तीनच वाहनांना प्रवेश असेल. नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देत असताना उमेदवारासह केवळ 5 व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल. नामनिर्देशनपत्र मिरवणूकीने भरत असल्यास त्याच्या आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात अन्यथा आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होतील. जिल्हाधिकारी कार्यालयाला उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती मदत मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नामनिर्देशन अर्ज नमुना 26 (प्रतिज्ञापत्र) भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही 11 ते 3 या वेळेत शासकीय सुट्टी वगळून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
जिल्ह्यात  पिण्याच्या पाण्यासाठी 131 टँकर्स सुरू
दुष्काळामुळे जिल्ह्यातील 2 लाख 80 हजार लोक बाधित असून जिल्ह्यात 131 टँकर्स सुरू आहेत. अधिक मागणी आल्यास आवश्यकतेनुसार टँकर्स उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगून जिल्ह्यात दुष्काळनिधीची एकूण मागणी 168 कोटी 9 लाख 61 हजाराची मागणी असून त्यापैकी 116 कोटी 11 लाख 18 हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी 110 कोटी 98 लाख 26 हजार रूपयांचा निधी बँकेत जमा करण्यात आला आहे. जवळपास 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ निधीची रक्कम जमा झाल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.  शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 58 हजार 985 शेतकरी पात्र असून 2 लाख 39 हजार 334 शेतकऱ्यांची नावे वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा