सोमवार, २५ मार्च, २०१९

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


    सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : आदर्श आचारसंहिता कक्ष अधिक क्रियाशील होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होईल, त्या ठिकाणी कठोर कारवाई करा गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारांना सोयीसुविधा पुरवण्याबाबत सर्वांनी दक्ष राहावे. एक खिडकी योजना त्वरित कार्यान्वित करावी. ऑनलाईन अन्य प्रकारे येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करावे. निवडणूक यंत्रणांना प्रशिक्षणासाठी आराखडा तयार करावा. स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथकांनी सतर्क राहून कारवाई करावी. तसेच, इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित असल्याची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथकांची कार्यवाही गतिमान करण्याची गरज व्यक्त करत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करावी, असे ते म्हणाले.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा