मंगळवार, २६ मार्च, २०१९

मतदार जनजागृतीसाठी शनिवारी सांगलीत सायकल रॅली -महानगरपालिका उपायुक्त मौसमी बर्डे

सांगली, दि. 26 (जि.मा.का.) : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक 30 मार्च 2019 रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी स्टेडीयम सांगली येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार जनजागृतीसाठी या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, क्रीडा प्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन  महानगरपालिका उपायुक्त तथा स्वीपच्या नोडल अधिकारी मौसमी बर्डे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप उपक्रमांतर्गत सायकल रॅली नियोजन संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, सायकल असोसिएशनचे दत्ता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपायुक्त मौसमी बर्डे म्हणाल्या, सायकल रॅलीची सुरूवात मतदार शपथ घेवून शिवाजी स्टेडीयम सांगली येथून  शनिवार, दिनांक 30 मार्च 2019 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. ही रॅली पुढे सांगली हायस्कूल - पटेल चौक - गणपती मंदिर - हरभट रोड - आरवाडे हायस्कूल - महानगरपालिका - एस.टी.स्टॅण्ड रोड - झुलेलाल चौक - सिव्हील हॉस्पीटल चौक - राममंदिर चौक या मार्गे जिल्हा परिषद सांगली जवळील इम्यॅन्युअल स्कूलच्या मैदानात या रॅलीची सांगता होणार आहे.
या सायकल रॅलीमध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त हुसेन कोरबू शाहिद जमादार तसेच ज्येष्ठ सायकलपट्टू गोविंद परांजपे सहभागी होणार आहेत.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा