बुधवार, २७ मार्च, २०१९

उरुस कालावधीत निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक 10 मार्च 2019 पासून निवडणूक आचारसंहिता लागू केलेली आहे. मिरज येथे हजरत पीर ख्वॉजा शमना मिरासाहेब यांचा ऊरूस दिनांक 1 ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत होणार आहे. हा ऊरूस साजरा करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.
    हजरत पीर ख्वॉजा शमना मिरासाहेब यांचा ऊरूस कालावधीत कायदा सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज संदीप सिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, उपआयुक्त मिरज स्मृती पाटील, उपविभागीय अधिकारी मिरज डॉ. विकास खरात, हजरत मिरासाहेब दर्गा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
    या बैठकीत उरूस कालावधीत कायदा सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे, स्टॉल उभारणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा, पाळणे लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रिट पिटीशनमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदि विषयांबाबत सखोलपणे चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा