बुधवार, २० मार्च, २०१९

प्रचारसाहित्यावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव, पत्ता स्पष्टपणे दर्शवणे बंधनकारक

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचार साहित्याच्या मुद्रणाचे कामकाज पार पाडत असताना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 127 (अ) अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे. या तरतुदींचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 च्या तरतुदी विशेषतः मुद्रक प्रकाशक यांचे नाव पत्ता निवडणुकीच्या पत्रकावर किंवा पोस्टर्सवर किंवा इतर कोणत्याही छापील बाबीवर छापणे आवश्यक आहे. त्यांनी छापलेल्या साहित्याच्या चार प्रती आणि प्रकाशकाचे लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या 127 प्रमाणे आवश्यक प्रतिज्ञापत्र जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे छपाईच्या तारखेपासून 3 दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मुद्रकाने कोणतेही निवडणूक पत्रक किंवा पोस्टर्स छापण्यापूर्वी प्रकाशकाकडील लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 127 (2) प्रमाणे परिशिष्ट 2 प्रमाणे मध्ये प्रतिज्ञापत्र करून देणे आवश्यक आहे. मुद्रकांनी छापलेल्या पोस्टर्सच्या चार प्रती, सोबत त्याने विशिष्ट पत्रकाच्या किती प्रती छापल्या आणि छपाईची किती किंमत आकारली, याचीही माहिती परिशिष्ट मध्ये जिल्हा दंडाधिकारी यांना सादर करावी. ही माहिती एकत्रित देता प्रत्येक पत्रकाची किंवा पोस्टरची त्या त्या वेळी 3 दिवसांच्या आत दिली पाहिजे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या 127 अअन्वये तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम 127 (4) खाली सहा महिन्यांचा कारावास अथवा रुपये 2 हजार दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रकाशक, मुद्रक, मालक यांना सूचित करण्यात येते कि त्यांनी वरीलप्रमाणे सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा