बुधवार, २० मार्च, २०१९

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक यांची बैठक

सांगली, दि. 19 (जि. मा. का.) :  सांगली लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने आज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा महानगरपालिका उपायुक्त मौसमी बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांची  बैठक घेण्यात आली.
यावेळी उपायुक्त मौसमी बर्डे यांनी प्राथमिक मतदार जागृती मोहिमेबाबत माहिती दिली. मतदार जागृती मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या बैठकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक शिक्षकांनी वेगवेगळे उपाय सुचवले. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी सर्वानी मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन नोडल अधिकारी तथा उपायुुक्त मौसमी बर्डे यांनी केले.
या बैठकीस शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश  चोथे, महानगरपालिका प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा