शनिवार, १६ मार्च, २०१९

मजबूत लोकशाहीसाठी दमदार पाऊल - स्वीप मोहीम

लोकशाहीत मतदानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सक्षम लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा ही भावना निर्माण करून ती रूजवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी 'सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीम राबविली जात आहे. नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी आणि मतदारांना मतदानाचे महत्त्व समजून मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, राज्यघटनेने आपल्याला दिलेला हा अनमोल हक्क आपण बजावला पाहिजे. मात्र, गत लोकसभा निवडणूक 2014 मध्ये शहरी मतदारांची उदासिनता दिसून आली. सांगली विधानसभा मतदारसंघातील केवळ 59.50 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण सांगली जिल्ह्यात गत लोकसभा निवडणूक 2014 मध्ये सरासरी 65.67 टक्के मतदान झाले होते. तर 44 सांगली लोकसभा मतदारसंघात 63.68 टक्के नागरिकांनी मतदान केले होते. त्यामुळे मजबूत लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून, त्यामुळे आपण आपल्या देशाला चांगल्या मार्गावर नेऊ शकतो.
या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी तथा महानगरपालिका उपायुक्त मौसमी बर्डे - चौगुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल गावडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांच्या टीमने मतदार जनजागृतीसाठी आराखडा बनवला आहे. विविध स्पर्धा, उपक्रम, पथनाट्य, प्रसिद्धीमाध्यमे  या माध्यमातून जनजागृती करून लोकशाहीत मतदानाचे महत्त्व मतदारांना विशेषतः महिला व नवमतदारांना समजून सांगण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच प्राचार्यांची उद्‌बोधन कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा निवडणूक विभागाच्या टीमने केलेल्या प्रयत्नांमुळे सांगली जिल्ह्यात गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. सांगली जिल्ह्यात 23 लाख 50 हजार 296 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदानापूर्वी 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. त्यामुळे गो व्हेरिफाय च्या माध्यमातून मतदार यादीत आपले नाव आहे का, याची खात्री करणे आपले आद्य कर्तव्य आहे. परंतु, केवळ मतदार यादीत नाव असून उपयोगाचे नाही तर कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी पडता निवडणुकीमध्ये आपल्या मताधिकाराचा उपयोग व्हावा.
या पार्श्वभूमिवर स्वीपकडे एक उपक्रम म्हणून न पाहता त्याचे एका मोहिमेत रूपांतर होत आहे. मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा सर्वतोपरी उपयोग करून घेण्यात येत आहे. वक्तृत्त्व स्पर्धा, निवंध स्पर्धा, पथनाट्य, खुली चित्रकला स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, नो बुक डे, रॅली, रन फॉर वोट, रन फॉर इंडिया इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.  
    या अभियानांतर्गत लोकशाही बळकट करण्यास माझे मतदान, भारत माझा देश आहे, मी एक जागरूक मतदार, लोकशाहीमध्ये नवमतदाराची भूमिका, नैतिक मतदान - एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयांवर 5 ते 7 मिनिटांची वक्तृत्व स्पर्धा तसेच, 1500 शब्द मर्यादांची निबंध स्पर्धा दिनांक 17 मार्च 2019 रोजी कस्तुरबा वालचंद महाविद्यालय, सांगली येथे घेण्यात येणार आहे. अकरावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच, 24 मार्च रोजी खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांसाठी रोख रक्कम स्वरूपात बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वक्तृत्त्व स्पर्धेसाठी 16 मार्चपू्र्वी आणि चित्रकला स्पर्धेसाठी 23 मार्चपू्र्वी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद येथे नावनोंदणी करायची आहे. चित्रकला स्पर्धेतील सहभागींच्या चित्रांच्या प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच, 17 मार्च रोजी चुनावी पाठशाला उपक्रम घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 23 मार्च रोजी नो बुक डे साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तके न आणता पालकांना घेऊन शाळेत आहे. विद्यार्थ्यांनी पालकांपुढे मतदानाचे महत्त्व या विषयावर आपले विचार व्यक्त करायचे आहेत. यातून त्यांच्यामध्ये मतदान करण्याविषयी संवेदनशीलता जागवण्यात येणार आहे. त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या माध्यमातून त्यांच्या मध्ये स्टेज डेअरींग, विचार व्यक्त करण्याचे कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य विकसित होण्यासही मदत होणार आहे.
तसेच, 26 मार्च रोजी विद्यार्थ्यांनी पालकांना उद्देशून पत्रलेखन करून मतदानाचे महत्त्व सांगणारा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. शाळेत लिहिलेले हे पत्र घरी घेऊन जावून, या पत्रावर विद्यार्थ्यांनी पालकांची सही घ्यावयाची आहे. प्रत्येक तालुक्यातून 3 सर्वोत्कृष्ट पत्रे जिल्हा स्तरावर पाठवण्यात येणार आहे. याचबरोबर  पथनाट्य, बोधवाक्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे. 30 मार्च रोजी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. तसेच, 19 एप्रिल रोजी रन फॉर व्होट, रन फॉर इंडिया होणार आहे.
तसेच, क्रीडा विभागाच्या सहकार्याने गावोगावी मल्लखांब प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर मतदार जनजागृतीच्या जिंगल्स प्रसारित करण्यात येणार आहेत. सर्व बसस्थानके. सिनेमागृहे, एटीएम, आठवडी बाजार, आकाशवाणी, हमाल पंचायत, ऊसतोड कामगार यांचे प्रत्यक्ष ठिकाणी जागृती उद्‌बोधन करण्यात येणार आहे. रॅली, जीवनावश्यक वस्तुंच्या बिलांवर मतदानाचे महत्त्व सांगणारे संदेश, घंटागाड्यांवर फलक, सफाई कामगारांकडे पाम्प्लेटस्, कापडी पिशव्या, स्टिकर्स या माध्यमातूनही मतदान करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
एकूणच लोकसभा निवडुणकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप मोहिमेच्या माध्यमातून प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, अशा मोहिमेत हे शासनाचे काम असा दृष्टीकोन ठेवता आपलेही देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेत आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करून थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे. तसेच, मतदानाच्या सुटीदिवशी सहल काढणे, मी मतदान नाही केले तर काय फरक पडणार ही उदासिनता दूर करून मतदानाबाबत कर्तव्यभावना ठेवणे गरजेचे आहे. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल.
संप्रदा द. बीडकर
माहिती अधिकारी, सांगली




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा