बुधवार, २० मार्च, २०१९

दिव्यांग मतदारांना सुविधा द्या - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सोयी सुविधा पुरविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढाव्याच्या अनुषंगाने सर्व समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ,. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी         डॉ. विजय देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
    डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने - आण करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध ठेवावीत. व्हील चेअर्स, रँप आदि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या वाहनातून दिव्यांग मतदार प्रवास करणार आहेत, त्यावर मार्किंग करा. दिव्यांग मतदारांशी संभाषण सुलभ व्हावे, यासाठी सांकेतिक भाषा (साईन लँग्वेज) प्रशिक्षित व्यक्ती नियुक्त करा. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट, गाईड त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नये, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथकांनी अधिक परिणामकारकपणे काम करावे, असे सांगून डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, आचारसंहिता भंग होत असेल तिथे कठोर कारवाई करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. स्वीप उपक्रमाच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी कृती आराखडा तयार करावा. इपिक कार्डांचे वितरणही तातडीने करावे, अशाही त्यांनी सूचना दिल्या. तसेच, कोणत्याही उमेदवारांना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून तसेच सोशल मीडियावर जाहिरात करण्यापुर्वी प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. जाहिरात प्रमाणित करणे आवश्यक आहे, असेही श्री. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राजकीय पक्ष उमेदवारांच्या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या अकाऊंटवर लक्ष ठेवावे, असेही सांगितले.
यावेळी त्यांनी निवडणूक कामकाजासाठी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले. मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, वाहतूक, प्रशिक्षण आणि साहित्य सामग्री व्यवस्थापन, c-Vijil, आचारसंहिता कक्ष, खर्च नियंत्रण, उत्पादन शुल्क विभागाकडून होणारे मॉनिटरिंग, माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती आदि बाबींचा आढावा घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
    कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने एसएसटी पथके, चेक नाके, प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त आदिंबाबत डॉ. म्हैसेकर यांनी आढावा घेतला. सभा, कॉर्नर सभांसाठी परवानगी देत असताना सर्वांना समान न्याय द्या, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्राप्त प्रस्तावांवर तात्काळ कार्यवाही करावी. निवडणूक आयोगाची सर्व आयटी ऍ़प्लिकेशन्स सुरू करावीत. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या मनुष्यबळाच्या आरोग्यासाठी आवश्यक तजवीज ठेवावी, असे सांगितले. तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्याकडून त्यांनी माहिती जाणून घेतली.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत आणि महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी निवडणूक अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा