गुरुवार, २८ मार्च, २०१९

निवडणूक खर्च संनियंत्रण अनुषंगिक तरतुदींचे काटेकोर अनुपालन करा - निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया

-         खर्च संनियंत्रण पूर्वतयारीचा घेतला आढावा
-         29 मार्च रोजी संयुक्त आढावा बैठक
-         तक्रारीसाठी संपर्क क्रमांक 9423250756 उपलब्ध


सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने 44- सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्चाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता आणि त्याचे संनियंत्रण यंत्रणेकडून केले जाणारे सक्त संनियंत्रण याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील अनुषंगिक तरतुदी आणि निवडणुकांचे परिचालन नियम 1961 मधील अनुषंगिक तरतुदींचे काटेकोर अनुपालन करण्याचे सक्त निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया यांनी आज येथे दिले.
44- सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया सांगलीमध्ये आज दाखल झाले. त्यांनी निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेवून विस्तृत चर्चा केली. तसेच, त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक खर्च संनियंत्रण करण्यासाठीच्या पुर्वतयारीची विस्तृत माहिती जाणून घेतली.
यावेळी निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजासाठीचे नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, सुशीलकुमार केंबळे, अविनाश जाधव, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संपर्क अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक खर्च संनियंत्रणाचे कामकाज प्रभावीपणे आणि सतर्कतेने पार पाडले जाईल, यासाठी सर्व यंत्रणा दक्ष राहतील आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची कसर / उणीव राहणार नाही, अशी अपेक्षा श्री. भदादीया यांनी व्यक्त केली.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया यांनी निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत अंमलात आणलेल्या उपाययोजनांचा आणि निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेमधील मनुष्यबळाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन करण्यात आलेल्या तयारीचे तपशीलवार सादरीकरण केले. त्याच प्रमाणे राकेश भदादीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणन संनियंत्रण कक्ष, तक्रार निवारण आणि सीव्हिजील कक्ष येथे प्रत्यक्ष भेट देवून कामकाजाची पाहणी केली.
29 मार्च रोजी घेणार संयुक्त आढावा बैठक
निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेतील विविध पथके, तक्रार निवारण आणि हेल्पलाईन कक्ष, माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग, पोलीस विभाग, इत्यादी विभागांची निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजामधील भूमिका आणि त्यासंदर्भात त्यांचेकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना याचा सखोल आढावा घेण्यासाठी दिनांक 29 मार्च 2019 रोजी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुपारी 4.00 वाजता राकेश भदादीया यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
तक्रारीसाठी संपर्क
राकेश भदादीया यांचा विशेष भ्रमणध्वनी क्रमांक 9423250756 असून तक्रारी-सूचना आणि संपर्क साधण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा