शुक्रवार, २२ मार्च, २०१९

सर्वजण मिळून क्षयरोग संपवूया

दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. वास्तविक, क्षयरोगाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलणेे आणि क्षयरोगाविषयी जनजागृती होणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यानिमित्त विशेष लेख....
पूर्वी क्षयरोग होण्याचे कारण कोणत्या रोगजंतुमुळे हे माहित नव्हते. क्षयरोगास कारणीभूत असणारा जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा 24 मार्च 1882 रोजी सर रॉबर्ट कॉक या जर्मन वैज्ञानिकाने शोधून काढला. त्या निमित्ताने 24 मार्च हा दिवस जगभरामध्ये क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक स्तरावर विचार केला तर जगातील क्षयरोगाची लागण झालेल्या क्षयरूग्णांपैकी 25 टक्के क्षयरूग्ण भारतात आढळतात. देशात दररोज 5 हजार लोकांना क्षयरोग होतो. दर 5 मिनिटांना 2 रूग्ण क्षयरोगाने दगावतात. या पार्श्वभूमिवर या वर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेचे घोष वाक्य आहे "हीच वेळ आहे ....." यामध्ये हीच वेळ आहे क्षयरोग जाणून घेण्याची आणि क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची ही संकल्पना आहे.
क्षयरोगाला आळा घालण्यासाठी भारतामध्ये 1962 साली राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1993 साली या कार्यक्रमात सुधारणा करून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
सांगली जिल्ह्यामध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यामध्ये 59 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 15 ग्रामीण रूग्णालये 320 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी डॉटस् औषधोपचार पध्दती क्षयरूग्णांस मोफत दिली जाते. तसेच डॉटस् प्रणाली रूग्णांना सुलभ वेळेत उपलब्ध करून मिळावी या उद्देशाने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फतही उपलब्ध करून दिली जाते. डॉटस् प्रणालीमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 90 ते 95 टक्के इतके आहे.
क्षयरोगाची लक्षणे
·       दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला.
·       रोज सायंकाळी येणारा हलकासा ताप.
·       भूक मंदावणे किंवा भूक लागणे.
·       वजन कमी होत राहणे.
·       रात्री खूप घाम येणे.
·       छातीत दु:खणे.
·       काही गंभीर क्षयरूग्णाच्या बेडक्यातून रक्त पडणे.
  अशी लक्षणे रूग्णामध्ये आढळून आल्यास नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रात दोन बेडका नमुने तपासणी करून घ्यावे त्यात काही दोष आल्यास औषधोपचार सुरू करण्यात येतो. क्षयरोगाचे मुख्यत: फुप्फुसाचा क्षयरोग फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग या दोन प्रकारामध्ये वर्गीकरण होते.
निदान
   फुप्फुसाचा क्षयरोगाचे निदान करण्यासाठी दोन बेडका नमुने घेणे आवश्यक असून त्याची तपासणी प्रमाणित सूक्ष्मदर्शी केंद्रामध्ये करून घेतली जाते. तसेच रूग्णांचे छातीचा एक्सरे काढून निदान केले जाते. बेडका तपासणीची सोय सर्व सरकारी आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. फुप्फुसाचा क्षयरोग   हा मानवी दात, केस, नखे वगळता कोणत्याही अवयवांना होऊ शकतो. यामध्ये गंडमाळा, पोटाचा, हाडांचा, मज्जासंस्था, जनन विसर्जन संस्थेचा क्षयरोग होऊ शकतो. याचे निदान हे उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा रूग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी मोफत केले जाते. निदान झालेल्या सर्व क्षयरूग्णांना औषधोपचार लागू पडतात किंवा नाही हे पाहण्यासाठी CBNAAT मशीनव्दारे तपासणी केली जाते. तसेच अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती जसे की, एचआयव्ही बाधीत रूग्ण, लहान बालके, एमडीआर क्षयरूग्णांच्या सहवासातील व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचे औषध घेतलेल्या व्यक्ती यांची दखल CBNAAT मशीनव्दारे केली जाते. ही मशीन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर येथे उपलब्ध आहे.
डॉट्स प्रणाली
   सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास अत्यंत प्रभावी अशी डॉट्स औषधोपचार प्रणाली सुरू करण्यात आली. डॉट्स म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेला औषधोपचार. निदान झालेल्या सर्व क्षयरूग्णांना औषधोपचार चालू केला जातो त्याच्या संनियंत्रणाकरिता 99 डॉट्स ही अत्याधुनिक प्रणाली वापरली जाते.
   सर्व जनतेने जागरूक राहून दोन आठवडे किंवा जास्त कालावधीचा खोकला असल्यास त्या रूग्णास जवळच्या सरकारी रूग्णालयामध्य जाऊन दोन बेडका नमुन्याची तपासणी करून घेण्याचा सल्ला द्यावा. तसेच क्षयरोग असल्यास नियमित पूर्ण कालावधीचा उपचार घेण्यास प्रवृत्त करावे यासाठी आपणाला सर्वांनाच म्हणावे लागेल :-
·       जगातून क्षयरोग दूर करण्याची हीच खरी वेळ आहे.
·       महत्ताकांक्षी संशोधनाची हीच खरी वेळ आहे.
·       सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातून क्षयरूग्णापर्यंत पोहोचवण्याची हीच खरी वेळ आहे.
·       औषधाला दाद देणाऱ्या क्षयरूग्णांसाठी महत्त्वाकांक्षी नविन ध्येय ठरवण्याची हीच खरी वेळ आहे.
·       टीबी-एचआयव्ही रूग्णांमध्ये एकही मृत्यु होणार नाही या करिता जलद गतीने हालचाल करण्याची हीच खरी वेळ आहे.
एकूणच समाजातील प्रत्येक घटकाने जर ठरविले की, आपला देश टीबी मुक्त देश बनविण्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण करू, तर टीबी मुक्त देश करणे शक्य आहे. लवकर निदान आणि नियमित औषधोपचारामुळे क्षयरोग हा पूर्णपणे बरा होता.


             संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा