रविवार, २४ मार्च, २०१९

लोकसभा निवडणुकीत दिव्यांगानी मतदान करण्यासाठी सुविधा - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी रॅम्प, व्हील चेयर, आदि सुविधा देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी मतदान करून निवडणूक प्रक्रियेतील पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
शासकीय रूग्णालय येथे दिव्यांगांसाठीच्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मतदान जनजागृतीवर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या पत्नी अनुराधा राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे. कुठलाही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी रँप, सहाय्यक, ब्रेल लिपीची सुविधा, सांकेतिक दुभाषी अशा विविध सोयीसुविधा देण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावताना कुठलीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
पथनाट्य सादरीकरणात दिव्यांग स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी रामदास कोळी, आशा पाटील, शीतल दबडे, झाकीर मुजावर, संग्राम घोरपडे, विनोद पाटील, महेश नवाळे, रेशमा नदाफ, बाळासो गणे आदिंनी सहभाग घेतला.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा