शनिवार, २३ मे, २०२०

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : कोविड-19, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 23 मे 2020 रोजीचे 1200 वाजल्यापासून ते दिनांक 07 जून 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 23 मे 2020 रोजीच्या 1200 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 7 जून 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा