शनिवार, ३० मे, २०२०

खानापूर तालुक्यातील सुलतानगादे गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : खानापूर तालुक्यातील सुलतानगादे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील 1) पूर्व दिशा - धनाजी आत्माराम जाधव यांच्या घरापर्यंत (पिठाच्या गिरणी पर्यंत) 2) पश्चिम दिशा - सचिन विश्वास शिंदे यांच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यापर्यंत 3) दक्षिण दिशा - पूर्व पश्चिम जाणाऱ्या हमरस्त्याच्या उत्तर बाजूपर्यंत 4) उत्तर दिशा - अग्रणी नदी (गवळी वस्ती पर्यंत), या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पश्चिम दिशा - हमरस्त्याच्या अग्रणी नदीवरील पुलापर्यंत अग्रणी नदी 2) दक्षिण दिशा -सुलतानगादे खानापूर शीव, बेणापूर तालीम पर्यंत 3) दक्षिण दिशा - पापनाशी ओढा सुलतानगादे, रामनगर खानापूर शीव 4) उत्तर दिशा - अग्रणी नदी पर्यंत.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा