सोमवार, ४ मे, २०२०

सांगली जिल्ह्यातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात अडकलेले परराज्यात, परजिल्ह्यातील मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांना त्यांच्या स्वगृही जायाचे असल्यास त्यांनी https://covid19.mahapolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्हयातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याची आवश्यकता नाही. सदर व्यक्तींनी https://covid19.mahapolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयामधील सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठीची परवानगी सदर प्रवाशी ज्या जिल्हयात जाऊ इच्छितात त्या संबंधित जिल्हादंडाधिकारी यांना पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. त्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करता येईल. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे.
सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी  https://sangli.nic.in/notice/regarding-filling-information-for-tourists-students-pilgrims-workers-others-to-travel-from-sangli-district-to-other-states-districts/ या देखील गुगल लिंकचा वापर करता येईल. 
सांगली जिल्ह्यात येण्यासाठी
तसेच सांगली जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींनी त्यांच्या स्वगृही येण्यासाठी, ते ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. असे ही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. संदर्भात काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 व मो.क्र. 9370333932, 8208689681 या क्रमांकावर संबंधित व्यक्तींनी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 ची संपर्क सुविधा सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकरीता उपलब्ध आहे.
सदर प्रवासासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांचे ना हरकत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या  कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून परवानगी दिली जाईल. या प्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी करण्यासाठी जिल्हा स्थलसीमा हद्दीवरील चेक पोस्टवर व आरोग्य पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. देण्यात येणारी परवानगी ही जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या व या पुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा