शुक्रवार, १ मे, २०२०

कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या पथकाला आवश्यक सर्व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा - पालकमंत्री जयंत पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजच्या आधुनिकीकरणासाठी आराखडा तयार करा
    
सांगली, दि. 01, (जि. मा. का.) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी विविध यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोविड-19 च्या आयसोलेशन कक्षात काम करणाऱ्या पथकाला आवश्यक सर्व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असे सांगून कोविड रूग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबाबत सखोल विचारणा केली.
या बैठकीस कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील कोविड संदर्भातील रूग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली. यामध्ये आजअखेर ८९१ थ्रोट स्वॅब तपासण्यात आले असून त्यापैकी ३१ पॉझीटीव्ह तर ८३२ निगेटीव्ह (रिपीट ९८) अहवाल प्राप्त झाले आहेत. २८ अहवाल प्रलंबित आहेत. २६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४ रूग्ण कोविड रूग्णालयात मिरज येथे उपचाराखाली आहेत. ८ ठिकाणी करण्यात आलेल्या संस्था अलगीकरणामध्ये एकूण १७० व्यक्ती आहेत. तर गृह अलगीकरणामध्ये ३९६ व्यक्ती आहेत. संभाव्य रूग्ण वाढ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील त्रिस्तरीय उपचार पध्दती कार्यान्वीत करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये ३८ ठिकाणी कोविड केअर सेंटर, ४९ ठिकाणी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व ४ जिल्हास्तरीय कोविड हॉस्पीटल यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या बैठकीत दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज यामध्ये आधुनिकता व सुसुत्रता आणणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांनी सर्वांगीण आराखडा तयार करावा व तो प्रस्तावित करावा. त्याच्या निधीसाठी पाठपुरावा करू असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर ग्रामीण रूग्णालयात टाटा ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत इंन्टेसीव्ह केअर युनीट (आयसीयु) ची सुविधा निर्माण करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे सदर ठिकाणी अत्याधुनिक सुविधा निर्माण होतील. त्यासाठी टाटा ट्रस्ट बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समन्वय ठेवावा, असे सूचित केले.
महाराष्ट्र व देशभर सांगली जिल्ह्यातील गलई बांधव पसरलेले आहेत. ते ज्या राज्यामध्ये सद्या वास्तव्यास आहे त्या राज्यांनी त्यांना प्रवासाची अनुमती दिली तर त्यांना स्वीकारण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा आवश्यक कार्यवाही करू शकते, असे स्पष्ट करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्यांना आपल्या मूळ जिल्ह्यात परत यावयाचे आहे त्यांनी संबंधित राज्यातील यंत्रणेकडे संपर्क साधावा. सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांना आल्यानंतर पुन्हा १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनामार्फत कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उद्योजक उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे  अर्ज येत  आहेत, असे सांगून ज्या उद्योजकांना आपले उद्योग सुरू करावयाचे आहेत त्यांनी कामगारांची वाहतूक करण्यासाठी समर्पित वाहन व्यवस्था करावी, असे निर्देशित केले आहे त्यानुसार जे उद्योजक निर्देशित प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देतील त्यांना परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील उद्योग पुन्हा सुरू होत आहेत, असे यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सद्या २१ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांना थाळ्यांची संख्या वाढवून देण्यात यावी, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा