गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

सांगली जिल्ह्यात येण्यासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी संबंधित ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी राहत असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करावा

सांगली, दि. 01, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामास अडकलेली व्यक्ती यांनी त्यांच्या स्वगृही येण्यासाठी ते ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी प्रक्रियेस होणारा विलंब टाळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सदर प्रवासासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांचे ना हरकत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या  कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून परवानगी दिली जाईल. या संदर्भात काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 व कंट्रोल रूम सांगली च्या 8208689681 या क्रमांकावर संबंधित व्यक्तींनी संपर्क साधावा. या प्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी करण्यासाठी जिल्हा स्थलसीमा हद्दीवरील चेक पोस्टवर व आरोग्य पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल.
सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित व्यक्तींनी ते राहत असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करावा. या बाबत काही शंका असल्यास तहसील कार्यालयाच्या दूरध्वनी अथवा ई-मेलवर संपर्क साधावा. त्यानुसार शासन निर्णयामधील सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून त्यांची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयास केली जाईल. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठी परवानगी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांना पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे.
तहसिल कार्यालयाचे नाव, ई-मेल व कंसात फोन नं. पुढीलप्रमाणे. मिरज – mirajtahsildar@gmail.com (0233-2222682), तासगाव – tastahsildar@gmail.com (02346-250630), कवठेमहांकाळ – kmtahsildar@gmail.com (02341-222039), वाळवा – waltahsildar@gmail.com (02342-222250), शिराळा – shiralatahsil@gmail.com (02345-272127), विटा – tahsildarvita@gmail.com (02347-272626), आटपाडी – tahatpadi@gmail.com (02343-221624), कडेगाव – tahasilkadegaon2347@gmail.com (02347-243122), पलूस – tahsildarpalus@gmail.com (02346-226888), जत – jathtahsildar@gmail.com (02344-246234).
या प्रमाणे देण्यात येणारी परवानगी ही जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या व या पुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा