रविवार, १९ एप्रिल, २०२०

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत काही बाबी सुरू करण्यासाठी सर्व समावेशक सूचना जारी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : केंद्र राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही बाबींमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून अंशत: शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबरोबरच कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने यापूर्वी देण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश पूर्णत: रद्द करण्यात आलेले नाहीत, अशी स्पष्टता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर आणि सांगली येथे कंटेनमेंट झोन बफर झोन आराखड्‌यांची अंमलबजावणी सुरू असून या दोन्ही ठिकाणी कोणत्याही प्रकारची लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमध्ये सूट दिलेली नसून अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे ही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधोरेखित केले.
मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, डिस्पेंसरी, पशुवैद्यकीय दवाखाने या बाबी जीवनावश्यक सेवांमध्ये येत असल्याने यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कृषि संदर्भात शेतीवरील पूरक कामे करण्यास पूर्वीप्रमाणेच परवानगी देण्यात आली आहे. पशुसंवर्धनामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने, जनावरांच्या खाद्याची दुकाने / आस्थापना या संबंधित बाबी सुरू ठेवण्यात येतील. बँक, एटीएम, सहकारी सोसायट्या पूर्वी प्रमाणेच सुरू राहतील.
अंगणवाड्या बंद करण्यात आल्या असून बालकांना देण्यात येणारा पोषण आहार घरपोच देण्यात येत आहे. कोचींग क्लासेस बंद करण्यात आले असून ऑनलाईन कोचींग सुरू ठेवता येतील. मजूरांच्या हाताला काम मिळावे यासाठी ग्रामीण भागात मनरेंगा अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना प्राधान्याने परवानगी देण्यात येईल. ज्या ठिकाणी वैयक्तिक कामे नाहीत त्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपाची कामी हाती घेण्यात येतील तथापि या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व उपाययोजना पाळण्यात येतील.
सार्वजनिक उपयुक्ततेची कामे उदा. इलेक्ट्रीसीटी, पेट्रोलियम आदि बाबी सुरू ठेवण्यात आलेली आहेत. सांगली जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने या ठिकाणी टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुरू राहणार आहेत.
आवश्यक सेवा वगळून लोकांच्या ट्रान्सपोर्टेशनशी संबंधित बाबी पूर्णत: बंद राहतील. सर्व प्रकारच्या माल वाहतूकीसाठी परवानगी देण्यात आली असून यामध्ये एका वाहनांवर जास्तीत जास्त दोन ड्रायव्हर, एक हेल्पर असावा, त्यांच्याकडे ड्रायव्हींग लायसन्स असावे. रस्त्यावरील धाब्यांवरून अन्न पाकीटे पुरविण्याची सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हायवेवरील ट्रक दुरूस्तीची दुकाने सुरू करण्यात येतील. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तू, सेवा घरपोच देण्याच्या दृष्टीने त्यामध्ये अधिक सक्षमता आणली जाईल. कुरिअर सर्व्हिसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

उद्योग घटक सुरू करणेबाबत
या अनुषंगाने महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील एमआयडीसी सहकारी औद्योगिक वसाहती मधील उद्योग घटकांना सूचित करण्यात येते की, जे उद्योग घटक आपल्या आस्थापनेवरील कामगारांची रहाण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करू शकतील, अशा आस्थापनांनी आपले उद्योग सुरू करण्याबाबत http://permission.midcindia.org या वेबसाईटवर अर्ज करावेत. सदर आस्थापनांच्या कामगारांना  कोणत्याही प्रकारे वाहतुकीची परवानगी देण्यात येणार नाही.       तसेच ग्रामीण भागातील उद्योग घटकांनी त्यांच्या कामगारांची ने-आण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून समर्पित वाहन व्यवस्थेची सुविधा पुरविण्याची खबरदारी घ्यावी. किंवा त्याच आस्थापना आवारात रहाण्याची व्यवस्था करावी. अशा आस्थापनांनीही आपले उद्योग सुरू करण्याबाबत http://permission.midcindia.org या वेबसाईटवर अर्ज करावेत. सर्व उद्योग घटकांनी महाराष्ट्र शासनाचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1 दि. 17 एप्रिल 2020 मधील परिशिस्ट II मध्ये नमूद केलेल्या कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या सोशल डिस्टन्सिंग एसओपी (Standard Operating Procedure) चे पालन करणे अनिवार्य आहे.
ग्रामीण भागात विटभट्या सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तुशी संबंधित सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात रस्ते, इरिगेशन प्रकल्प, सार्वजनिक इमारती किंवा इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट सुरू करण्यात येतील. खाजगी बाबतीत अत्यंत निकड असल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही. रिनेबल एनर्जी प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागांमध्ये ज्या ठिकाणी कामगार थांबून आहेत अशा प्रकल्पांबाबत महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी निर्णय घेतील.
सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या पावसाळापूर्व निकडीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. लोकांनी अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडत असल्यास टूव्हीलरवर  एकच व्यक्ती असावा फोर व्हीलर असल्यास त्यामध्ये दोनच व्यक्ती असाव्यात.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा