बुधवार, २९ एप्रिल, २०२०

सांगली बाजार समितीमध्ये हळदीच्या ऑनलाईन लिलावास सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी.

   सांगली, दि. 29 (जि. मा. का.) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  सांगली बाजार समितीस भेट देवून हळदीचे सौदे उघड पध्दतीने घेण्याऐवजी ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सुचित केले होते. त्यास अनुसरून दि. 29 एप्रिल पासून ऑनलाईन पध्दतीने हळदीच्या लिलावास सुरुवात झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे 193 व्यापारी असून जवळपास 130 आडते कार्यरत आहेत. मागील दीड महिन्यापासून हळदीचे सौदे रखडलेले होते. तसेच शेतकऱ्यांची हळद त्यांच्याकडेच पडून असल्याने सौद्याअभावी त्यांना हळदीची विक्री करण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. हळदीच्या उघड पध्दतीने लिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदे करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते.
ई-नाम लिलाव प्रक्रियेमध्ये आडत्याच्या दुकानासमोर शेतकरी निहाय व हळदीच्या गुणवत्तेनुसार नमुने ठेवले जातात. ज्यावर ई-नाम पोर्टलवरून प्राप्त झालेली विशिष्ट क्रमांकाची पावती ठेवलेली असते. सदर पावतीवर शेतकऱ्याचे नाव, आडत्याचे नाव, हळदीचा प्रकार व परिमाण इत्यादी माहिती खरेदीदारास उपलब्ध होवू शकते. बाजार समितीने निश्चित केलेल्या वेळेमध्ये ई-नाम या पोर्टलवर नोंदणीकृत खरेदीदार हळदीचे नमुने पाहू शकतात व त्यांनी खरेदी करावयाच्या लॉट साठी त्यांची किंमत ऑनलाईन मोबाईल फोनवरून अथवा संगणकावरून नमुद करू शकतात. सौद्याची वेळ संपल्यानंतर ज्या खरेदीदाराने सर्वाधिक बोली लावलेली आहे त्यांचा सौदा संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित केला जातो. त्यानंतर सर्वाधिक बोलीच्या रक्कमेस विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने संमती दिल्यानंतर तो व्यवहार पूर्ण होतो. अशा ऑनलाईन सौदे प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या खरेदीदारांना एकाच वेळी एकत्र येण्याची आवश्यकता नसून विहीत वेळेमध्ये त्यांच्या सवडीनूसार येवून खरेदी करावयाच्या मालाची पाहणी करू शकतात. या पध्दतीमुळे बाजार समितीच्या आवारामध्ये सामाजिक अंतर राखण्यास मदत होणार आहे. तसेच कितीही मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक झाली तरी एकाच दिवसामध्ये सौदे प्रक्रिया पूर्ण होवू शकणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगीतले.
सांगली बाजार समिती मार्फत  ई-नाम योजनेंतर्गत लिलाव होईपर्यंत ६० खरेदीरारांनी रजिस्ट्रेशन  केलेले होते. बुधवारी झालेल्या लिलावामध्ये एकूण ५ अडत्यांकडील २०७ शेतकऱ्यांची २५००  क्विंटल हळदीचे २१४ लॉट चे सौदे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. ऑनलाईन सौद्यामध्ये सर्वाधिक ९ हजार ९ रूपये व सर्वात कमी ४ हजार ३०० रूपये प्रती क्विंटल भाव मिळालेला आहे. या लिलाव प्रक्रियेदरम्यान बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे उपस्थित होते.
यापुढेही हळदीचे सौदे ऑनलाईन पध्दतीने होणार असून जास्तीत जास्त खरेदीदाराने ऑनलाईन सौदे प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या हळदीसाठी अधिकाधिक भाव मिळविण्यासाठी त्यांची हळद बाजार समितीमध्ये आणावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा