मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

इतर जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती न देणाऱ्या गावस्तरीय समित्यांवरही कारवाई होणार - जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी


सांगली, दि? 28 (जि.मा.का) : जगभर कोरोणाचे संकट थैमान घालत आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविधांगी उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या नियंत्रणाखाली गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत करण्यात आलेली आहे.
या समितीने परदेश प्रवास करून आलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची माहिती तहसील कार्यालयाला देणे क्रमप्राप्त असतानाही काही ठिकाणी अद्यापही बाहेरील जिल्ह्यातून प्रवासी सांगली जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होत असून त्यांची माहिती प्रशासनात अवगत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी विनापरवानगी इतर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या लोकांची यादी ग्रामस्तरीय समितीने तात्काळ तहसीलदारांना सादर करावी. तसेच तहसीलदारांनी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांची आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे निर्देशीत केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ज्या गाव स्तरीय समित्या आदेशित केल्याप्रमाणे आपले कर्तव्य चोख बजावणार नाहीत, अशा गाव स्तरीय समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे.
  प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे , प्रशासनाकडून प्राप्त होणारे प्रतिबंधात्मक आदेशांची माहिती गावातील लोकांना देणे, तसेच लोकांमध्ये प्रबोधन करणे, परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती तहसील कार्यालय यांना देणे यासाठी  मार्च महिन्यामध्येच स्थापन करण्यात आलेल्या गाव स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत करण्यात आलेली आहे. असे असतानाही काही ठिकाणी अद्यापही बाहेरील जिल्ह्यातून प्रवासी सांगली जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होत असून त्यांची माहिती प्रशासनात अवगत नसल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी 1मार्च 2020 पासून इतर जिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून ती ग्राम स्तरावर अद्ययावत ठेवावी. राज्य शासनाने लॉकडाऊन मधून सूट असणारे अगर अन्य जिल्ह्यातून सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने आलेले आहेत अशा व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करून तहसीलदार यांच्याकडे पाठवावी तहसीलदार यांनी अशा सर्व व्यक्तींची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करावी. आवश्यकता असल्यास आरोग्य विभागात आरोग्यविषयक पुढील कारवाई करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निर्देशीत केले आहे. याबरोबरच सांगली जिल्ह्यात प्रवेश बंदी आदेश लागू असताना देखील विनापरवानगी इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर डाऊन प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याने कायदेशीर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे, अशा व्यक्तींची माहिती तहसीलदार यांच्याकडे पाठवावी तहसीलदार यांनी अशा व्यक्तींची आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ग्रामस्तरावर स्थापन केलेल्या समितीकडून केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल घेऊन तहसीलदार यांनी तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे कार्यवाही केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा