गुरुवार, २ एप्रिल, २०२०

प्राधान्य कुटूंब व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून तिमाहीसाठी प्रति सदस्य प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
सांगली (जि.मा.का) 2 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी एप्रिल 2020 ते जून 2020 या तिमाहीसाठी प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत देण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांना कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकास घरपोहोच धान्य वितरीत करावयाचे आहे. तसेच अपरिहार्य कारणास्तव शिधापत्रिकाधारकास रास्तभाव दुकानावर जावे लागल्यास सोशल डिस्टन्सिंग ठेवून गर्दी करता 1 मीटर अंतरावरून धान्य द्यावयाचे आहे. यामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही याची खबरदारी रास्त भाव दुकानदारांनी घ्यावयाची आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
माहे एप्रिल, मे जून 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे वाटप विहीत दराने त्या त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय योजना लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका याप्रमाणे माहे एप्रिल 2020 करिता 23 किलो गहू 12 किलो तांदूळ तसेच मे जून 2020 या महिन्याकरिता लाभार्थ्यांना 25 किलो गहू 10 किलो तांदूळ प्रत्येक शिधापत्रिकेवर देण्यात येणार आहे. प्राधान्य योजनेतील कुटुंबाना दरमहा प्रति व्यक्ती 3 किलो गहू 2 किलो तांदूळ मिळणार आहे. गहू 2 रूपये प्रति किलो तांदूळ 3 रूपये प्रति किलो दराने वितरीत करण्यात येणार आहे.
माहे एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील नियमित अन्नधान्याचे वाटप पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांना पूर्ण होईल तद्नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत तांदळाचे वाटप प्रति लाभार्थी 5 किलो प्रमाणे करण्यात येईल. या प्रमाणेच माहे मे जून 2020 या महिन्याचे नियतन वितरीत करण्यात येणार आहे. मोफत तांदळाकरिता लाभार्थ्यांनी कोणतेही शुल्क भरावयाचे नाही. जे लाभार्थी एप्रिल महिन्यातील नियमित धान्य कोटा उचल करतील त्यांना मोफतचा तांदूळ मिळणार आहे. नियमित मासिक नियतन त्याच महिन्याचे मोफत अतिरिक्त नियतन असे दोन्ही धान्य वाटप करताना ई-पॉस व्दारे मिळालेली पावती ग्राहकाला देणे अनिवार्य असल्याच्या सूचना रास्तभाव दुकानदार यांना दिल्या आहेत. ई-पॉस वर काही तांत्रिक अडचण आल्यास हस्तलिखित पावती रास्तभाव दुकानदार ग्राहकांना देतील.
सांगली जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील कुटूंबसंख्या 32 हजार प्राधान्य कुटुंब योजनेतील कुटुंबसंख्या 3 लाख 65 हजार 514 आहे. अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजनेतील समाविष्ट एकूण 18 लाख 40 हजार 207 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय प्राधान्य लाभार्थ्यांना नियमित नियतनानुसार विहीत दराने माहे एप्रिलचे देय असणारे 5632.1 मे. टन गहू 3778 मे. टन तांदूळ तसेच 9200 मे. टन मोफत तांदूळ लाभार्थ्यांना वाटप केला जाईल. हीच कार्यपध्दती मे जून 2020 या महिन्यामध्ये अवलंबली जाईल.
00000









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा