गुरुवार, २ एप्रिल, २०२०

सांगली जिल्ह्यात 30 निवारा केंद्रात 3319 व्यक्ती - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली (जि.मा.का) 2 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर वाढत आहे. आपल्या देशात हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी 21 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 30 निवारा गृहांमधून सद्यस्थितीत 3 हजार 319 लोकांची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 384 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यात 2 निवारा केंद्रामध्ये 250 व्यक्ती, जत तालुक्यात 1 निवारा केंद्रामध्ये 61 व्यक्ती, खानापूर तालुक्यात 1 निवारा केंद्रात 22 व्यक्ती, आटपाडी तालुक्यात 5 निवारा केंद्रात 526 व्यक्ती, पलूस तालुक्यात 1 निवारा केंद्रात 10 व्यक्ती, वाळवा तालुक्यात 5 केंद्रामध्ये 1191 व्यक्ती, शिराळा तालुक्यात 1 केंद्रामध्ये 58 तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 6 निवारा केंद्रामध्ये 817 व्यक्ती आहेत. अशा एकूण 30 निवारा केंद्रामधून 3 हजार 319 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. तसेच 19 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे.  निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.
मालू हायस्कूल सांगली येथील निवारा केंद्रात असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पोहेगाव येथील संतोष मोहन भालेराव म्हणाले, गोव्यात कामाला होतो घरी चाललो होतो पण सद्या चालू असलेल्या परिस्थितीमुळे मी अटकलो मला रस्त्यातून निवारा केंद्रात आणले मला जेवणाची, रहाण्याची इतर भरपूर सुविधा दिल्या. सकाळचा चहा, नाष्टा जेवण व्यवस्थित मिळत आहे. काही मेडीकल बाबत अडचण असल्यास औषधेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबत त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
बयाजीराव सावंत म्हणाले, गेली चार ते पाच वर्षे सांगली येथे रहात असून हॉटेल मॅनेंजमेंटचे काम करत आहे. कोरानामुळे लॉकडाऊन केल्यामुळे मी इकडे तिकडे फिरत होतो. मला मालू हायस्कूल सांगली येथील निवारा केंद्रात आसरा मिळाला असून येथे रहाण्याची, खाण्याची, आंथरून पांघरून अशी सर्व सुविधा मिळत आहे. आमच्यावर अशा पध्दतीने लक्ष केंद्रीत केले आहे की, आजपर्यंत आम्हाला घरामध्ये सुध्दा असा सहारा मिळाला नाही. असे सुंदर काम निवारा केंद्राच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा