रविवार, १९ एप्रिल, २०२०

पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास 3 मे पर्यंत प्रतिबंध - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 14 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. सदर आदेशाचा कालावधी दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत निर्गमित करण्यात आला होता. तथापि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार लॉकडाऊन कालावधी दि. 3 मे 2020 रोजी पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 14 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 3 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत करण्याबाबत आदेशित केले आहे.
तथापि महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17 एप्रिल 2020 रोजीच्या आदेशान्वये शासनाने परवानगी दिलेल्या बाबींच्या कार्यस्थळी सदरचा आदेश शिथिल करण्यात येत असून सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 16 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे इस्लामपूर नगरपरिषद स्थलसीमा हद्दीत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन बफर झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 14 एप्रिल 2020 चा आदेश पूर्ण प्रभावाने लागू राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा