सोमवार, १३ एप्रिल, २०२०

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणतेही झोनींग केलेले नाही - राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम


कोरोनावर मात करण्यासाठी यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाने अथवा केंद्र शासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे अद्यापपर्यंत  झोनींग केलेले नाही. तसे करावयाचे झाल्यास राज्य शासन केंद्र शासनाबरोबर चर्चा करेल. भविष्यात कोवीड-19 च्या जिल्हानिहाय परिस्थितीचा विचार करून लोकांचे जीवनमान सुरळीत करण्याचे दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आजच्या घडीला अशा प्रकारचे कोणतेही झोनींग केलेले नाही, असे प्रतिपादन कृषि सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांना कोरोनाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल माहिती देत असताना ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. कोरोना बाधितांवर उपचार करणारे वैद्यकीय पथक स्वत:च्या जीवाची पर्वा करता चांगले काम करत आहे. त्यांनी सांगली जिल्ह्याची मान उंचावण्याचे काम केले आहे. जिल्हा प्रशासनही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत आहे. जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्वच यंत्रणा चांगले काम करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात येत्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने विहीत मापदंडानुसार खाजगी लॅबॉरेटरीजमध्येही कोरोना चाचणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपचारात्मक आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता याला राज्य शासनाची प्राधान्यता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोना संकटाला सामोरे जात असताना कम्युनिटी स्प्रेडींग होऊ नये यासाठी केंद्र राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असल्याचे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लोकसंख्येची घनता इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये जास्त आहे. यामुळे जर लॉकडाऊन लागू केले नसते तर याचा फार मोठा त्रास जनतेला झाला असता. देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. तथापी यामध्ये स्थीरता आहे. लोकांच्या संरक्षणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी शासन पावले उचलत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी अन्नधान्याचा पुरवठा व्यवस्थित केला जात आहे. सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांचे हॉस्पीटल रूग्णांसाठी खुले ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी कोणतेही बंधन नाही. या सुविधा सुरळीत चालू आहेत. अत्यावश्यक सेवा लोकांना देण्यासाठी कोणतीही तडजोड केली जात नाही. शिवभोजन केंद्रांना विविध ठिकाणी दिवसभरात भेटी दिल्या असून शिवभोजन केंद्राचा फायदा गोरगरीबांना होत आहे. तसेच रेशन दुकानांही भेटी दिल्या असून 90 ते 95 टक्के रेशन वाटप झालेले आहे. यामध्येही सुरळीतता असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज सिव्हील येथील प्रयोगशाळेच्या क्षमता वृध्दीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत तेथे एक आरटीपीसीआर मशिन होती, आता दुसरी आरटीपीसीआर मशिनही बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचणी तपासणीचा वेग वाढला जाणार आहे. ॲटो एक्सट्रॅक्टर साठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात आला असून तो प्राप्त झाल्यानंतर अधिक तपासणीचा वेग वाढेल. दोन हजार न्युक्लिक ॲसिड किटसाठी परवानगी देण्यात आली असून ज्या प्रमाणावर त्याची उपलब्धता होईल त्या प्रमाणात त्याचा साठा करण्यात येत आहे. नियोजित क्षमतेपेक्षा या लॅबची क्षमता सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा